प्रेस मीडिया लाईव्ह :
नांदेड : तब्बल दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दिवाळी सण हा पहिल्यांदाच निर्बंधमुक्त वातावरणात होत असल्यामुळे सामान्य नागरिकांत उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान कोरोना महामारीमुळे दोन वर्षे बाजारपेठा बंद असल्यामुळे व्यावसायिकांचे व्यवसाय डबघाईला आले होते.यावर्षी निर्बंध मुक्त वातावरणात दिवाळी साजरी होत असताना, धंदा चांगला होऊन व्यवसायास हातभार लागेल अशी स्थानिक व्यावसायिकांना अशा होती. मात्र ऐन दिवाळीत या स्थानिक व्यावसायिक आणि कारागिरांवर ऑनलाइन बाजारपेठे मुळे संक्रांत आली आहे.
दिवाळीच्या कालावधीत बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी रेलचेल सुरू असते. ज्यात मातीचे दिवे, आकाश कंदील, कानातील बाळी, रांगोळी विक्रेते या स्थानिक व्यावसायिकांना मोठा रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे दसरा, दिवाळी, पाडवा या कालावधीत नागरिकांनी केलेल्या भरमसाठ खरेदीवर स्थानिक रोजगारांचे आर्थिक बजेट अवलंबून असते. मात्र नागरिकांचा ऑनलाइन खरेदी विषयी वाढता कल, या स्थानिक रोजगाराच्या मुळावर उठलाय. कारण दिवाळसणात खरेदीदार नागरिक कपडा, बूट, ग्रोसरी, मोबाईल, टीव्ही, फ्रीज, कंदील,दिवे या छोट्यामोठ्या वस्तूसह इतर महागडे साहित्य हे ऑनलाइन खरेदी करत आहेत. त्यामुळे ऐन दिवाळसणात या स्थानिक कामगारांच्या हातचा रोजगार हिरावला गेलाय.
नागरिकांचा ऑनलाइन खरेदीचा वाढता कल लक्षात घेता, खरेदीदार नागरिक स्थानिक बाजारातील बाजारपेठेकडे पाठ करताना दिसत आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत स्थानिक दुकानदारावर ऑनलाइन बाजारपेठेमुळे संक्रांत आली. प्रत्येक्ष खरेदी पेक्षा, घरी बसल्या ग्राहकांकडून ऑनलाइन खरेदीला पसंती मिळतेय. ऑनलाइन खरेदी वाढल्यामुळे दिवाळीच्या सणातही छोट्यामोठया उद्योगाची खरेदी अभावी बोंबाबोंब होतेय. तर ग्राहक दिवाळीचा फराळ, कपडे, बूट, टीव्ही, मोबाईल ऑनलाइन खरेदी करत असल्याने स्थानिक व्यावसायिकांचे छोटेखानी व्यवसाय बसण्याचा मार्गावर आहेत.
गेली दोन ते अडीच वर्षे कोरोना महामारीमुळे बाजारपेठा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन मिटिंग, ऑनलाइन कॉन्फरन्स, ऑनलाइन क्लास ह्या संकल्पना वाढल्या आहेत. त्यातच बाजारपेठेत न जाता आल्यामुळे ऑनलाइन बाजारपेठा सुरू होऊन, प्रत्यक्ष खरेदीला बगल बसली आणि ऑनलाइन बाजार सुरू झाला. ज्याचा विपरीत परिणाम आता संपूर्ण बाजारपेठा सुरू झाल्यानंतर दिसू लागला आहे.
दरम्यान मागच्या काही काळापासून नागरिकांचा ऑनलाइन खरेदीकडे कल वाढला असून, शहरी भागासह ग्रामीण भागात ग्राहक किराणा सामान वगळता इतर सामान ऑनलाइन खरेदी करीत आहेत. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचा व्यवसाय मंदावल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेतघरपोच सेवा, सामान आल्यावर पैसे द्यायचे, सामान खराब झाले तर कंपनी परत घेणार आणि दर्जेदार वस्तू मिळतात. म्हणून तरुणांसह अबाल वृद्धांना ही ऑनलाइन खरेदीची चांगलीच भुरळ पडलीय. यामुळे बाजारपेठेतील स्थानिक व्यापाऱ्यांचा व्यवसाय मंदावल्याने, पर्याय जोड व्यवसाय काय करता येईल या विचारात अनेक व्यापारी आहेत. सध्या ऑनलाइन खरेदी जोरात होत आहे. यामुळे स्थानिक व्यापाऱ्याकडे खरेदी कोणी करीत नाही. जर कोणी स्थानिक व्यापाऱ्याकडे खरेदीला गेला तर ते ग्राहक उधारीवाले जास्त असतात. शहरातील या सवयी आता ग्रामीण स्तरावरही नागरिकांना लागत आहेत. ऑनलाइन खरेदीत मिळणारी ऑफर तसेच होणाऱ्या पैशाची बचत ही कारणे सांगत प्रत्येकजण ऑनलाईन खरेदीला महत्व देत आहे. या ऑनलाईन खरेदीमुळे मात्र छोटे व्यापारी चांगलेच डबघाईला आले आहेत.