निलंबीत पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला..



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई - निलंबीत पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्या विरोधात एलटी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये आंगडिया व्यवसायिकांकडून खंडणी मागितल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्रिपाठी यांनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने याचिका भेटाळत कुठलाही दिलासा देण्यास नकार दिला आहे. तसेच, न्यायालयाने प्राथमिक दृष्ट्या गुन्ह्यांत त्रिपाठी यांचा थेट सहभाग असल्याचे दिसून येत असल्याचे निरीक्षण नोंदवर त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले आहे. निलंबित पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्या विरोधात वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्ह्याची नोंद झाल्यापासून याचिका करते बराच काळ फरार आहेत. आयपीएस अधिकारी असल्याने त्याला तपासाच्या उद्देशाने कायद्याचे आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीचे त्यांना ज्ञान आहे, असेही अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. कुलकर्णी यांनी आदेशात नमूद केले आहे.

नेमकी भूमिका आणि सहभाग तपासणे आवश्यक -

एफआयआरमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख नसला तरी या खटल्यातील त्यांचा सहभाग नाकारता येणार नाही. अर्जदार हे वरिष्ठ अधिकारी असल्याने तपास अधिकारी त्यांच्या अधीन आहेत. अशा परिस्थितीत पुरावे आणि साक्षीदारांशी छेडछाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अर्जदाराला अटकपूर्व जामीन देता येणार नाही. त्यांची नेमकी भूमिका आणि सहभाग तपासणे आवश्यक असून, त्या हेतूने तपास अधिकार्‍यांसह त्यांची उपस्थिती आवश्यक असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज - डिसेंबर 2021 रोजी अंगाडिया असोसिएशनने मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे डीसीपी त्रिपाठींनी व्यवसाय सुस्थितीत सुरू ठेवण्यासाठी मासिक 10 लाखांची मागणी केल्याचा आरोप केले. नगराळे यांनी या आरोपांच्या चौकशीसाठी दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त दिलीप सावंत यांची नियुक्ती केली. झोन 2 मधील पोलीस निरीक्षक ओम वांगटे एपीआय नितीन कदम आणि पीएसआय समाधान जमदाडे यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा वांगटे यांच्या चौकशीदरम्यान त्रिपाठी यांचे नाव समोर आले आहे. एलटी मार्ग पोलीस ठाण्यात 18 फेब्रुवारी रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर युनिटने त्रिपाठी यांना फरार घोषीत केले आहे. गुन्हा दाखल झाल्यामुळे अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी त्रिपाठी यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

कोण आहेत सौरभ त्रिपाठी..? - 

डीसीपी सौरभ त्रिपाठी हे 2010 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्रिपाठी यांनी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलेले आहे. तिथे अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी त्यांनी बंदोबस्तासाठी चांगले काम केलेले होते. त्यानंतर मुंबईत परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्रिपाठी यांनी प्रोटेक्शन सिक्युरिटी विभागात डीसीपी म्हणून काम पाहिले आहे. त्यांची नियुक्ती परिमंडळ 2 मध्ये पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली होती, जिथे त्यांच्यावर खंडणीचे आरोप झाले.आरोपानंतर त्यांची बदली डीसीपी ऑपरेशन या ठिकाणी करण्यात आली. पण त्यांनी अद्याप चार्ज घेतला नाही. दरम्यान, त्रिपाठी यांना पहिले आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आहे. गृह विभागाला निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निलंबनाच्या प्रस्तावावर सही केल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले सध्या निलंबित डीसीपी सर्व त्रिपाठी फरार असून त्यांचा शोध मुंबई पोलीस घेत आहे.

नेमके काय आहे प्रकरणं..? 

एलटी मार्ग पोलीस ठाण्यातील तीन अधिकाऱ्यानी आंगाडिया व्यवसायिकांकडून खंडणी उकळल्याचे समोर आले होते. अंगाडिया व्यवसायिकाकडून खंडणी उकळल्याच्या प्रकरणामध्ये डीसीपी सौरभ त्रिपाठी यांचा समावेश असल्याचं समोर आले. पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांच्या चौकशीत त्रिपाठी यांचं नाव समोर आले आहे. सौरभ त्रिपाठी यांच्यावर अंगाडिया असोसिएशनकडून महिना 10 लाख खंडणी मागत असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी सौरभ त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post