1 नोव्हेंबरपासून सीटबेल्टचा वापर न केल्यास कारवाई ...
प्रेस मीडिया लाईव्ह :
सुनील पाटील :
मुंबईत चारचाकी गाडीतून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी सीटबेल्टचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. त्यानुसार, मंगळवार 1 नोव्हेंबरपासून सीटबेल्टचा वापर न केल्यास कारवाई केली जाणार आहे.मागील 15 दिवसांपूर्वी पोलिसांनी सीटबेल्टबाबत निर्णय घेतला होता. त्यानंतर ज्या वाहनांमध्ये मागील सीटवर सीटबेल्टची व्यवस्था नाही अशा वाहनांना सीटबेल्ट बसवता यावा यासाठी पोलिसांनी दिलेली १५ दिवसांची मुदत सोमवारी संपत आहे.
नवी दिल्लीत चालक आणि सहप्रवाशांनी सीट बेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. असाच नियम मुंबईतदेखील लागू करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी 14 ऑक्टोबरला जाहीर केले. मोटार वाहन (सुधारित) कायदा 2019 कलम 194 (ब) (1) (सीट बेल्ट न लावणे) अंतर्गत चारचाकी मोटार वाहनातील वाहनचालक व इतर प्रवासी यांनी प्रवास करताना सीटबेल्ट न लावल्यास दंडास पात्र असल्याची तरतूद आहे. त्यामुळे सहप्रवाशांना सीटबेल्टची सुविधा नसल्यास वाहनचालकांनी सोमवारी 31 ऑक्टोबरपर्यंत सीटबेल्ट बसवून घ्यावेत. 1 नोव्हेंबरपासून सहप्रवासी विनासीटबेल्ट आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक करावी केली जाईल, असे वाहतूक पोलिसांनी म्हटले होते.
वाहतूक पोलिसांनी दिलेली मुदत 31 ऑक्टोबरला संपत असल्याने मंगळवारपासून रस्त्यावरील वाहनांमध्ये सहप्रवाशाने सीटबेल्ट लावला नसेल तर इ चलान कारवाई करण्यात येईल, असे वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, मंगळवारपासून सुरु होणाऱ्या दंडात्मक कारवाई दरम्यान प्रवाशांचे पोलिसांसोबत खटके उडण्याची चिन्हे आहेत.