मुंबई विद्यापीठाने दाखवलेला वेग आणि तत्परता याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पीएचडी करणाऱ्यांना असंख्य दिव्यातून गेल्यानंतर, बरेच कष्ट केल्यानंतर ही पदवी मिळत असते. यासाठी सर्वसाधारणपणे 3 वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी लागत असतो. मात्र मुंबई विद्यापीठाने भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक नील सोमय्या यांना अवघ्या 16 महिन्यात पीएचडी प्रदान केली असल्याचे सांगितले जात आहे.
सोमय्या यांना पीएचडी बहाल करताना मुंबई विद्यापीठाने दाखवलेला वेग आणि तत्परता याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
नील सोमय्या यांनी ऑगस्ट महिन्यात पीचडीसाठी आपला प्रबंध सादर केला होता. त्यानंतर नील सोमय्या यांना अवघ्या दीड महिन्यात तोंडी परीक्षेसाठी बोलवण्यात आले होते. ही तोंडी परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबई विद्यापीठाने नील सोमय्या यांना पीएचडी पदवी प्रदान केली. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी ही 'एक्सप्रेस पीएचडी' असल्याचं म्हणत किरीट सोमय्या यांच्या राजकीय प्रभावामुळे त्यांना ती जलद वेगाने मिळाली असावी असा संशय व्यक्त केला आहे.
सोमय्या यांनी पीएचडीसाठी नोंदणी केल्याच्या अवघ्या 16 महिन्यानंतर म्हणजे 1 ऑक्टोबर 2022 मध्ये त्यांना पदवी देण्यात आली. नील यांनी त्यांचा प्रबंध सादर केल्याच्या 45 दिवसांत आणि तोंडी परीक्षेनंतर दुसऱ्या दिवशी ही पदवी दिल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. नील सोमय्या यांनी सिडनेहॅमच्या व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या 'सिमस्रीमध्ये 2017 साली नोंदणी केली होती. 2021 मध्ये त्यांचा पीएचडीसाठी विषय निश्चित झाला.
हिंदुस्थान टाईम्स या इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना मुंबई विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाने म्हटले की , 'नील सोमय्या हे राजकीय व्यक्तीचा मुलगा असल्याने त्यांना प्राधान्य दिल्याचं दिसतंय' पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेसाठी अनेक महिने वाटपाहावी लागते. या प्रकरणात मात्र मुंबई विद्यापीठाने अतिवेग धारण करत नील यांना व्हायवासाठी प्राधान्य दिलं आणि तोंडी परीक्षेच्या दुसऱ्याच दिवशी पदवीही देऊन टाकली असंही या प्राध्यापकाने म्हटले आहे.
नील सोमय्या यांनी 2016 साली पेट परीक्षा दिली होती. 'A study of perception and social media impact on political party image' हा विषय त्यांनी 2021 साली नोंदवला होता. 17 ऑगस्ट 2022 मध्ये नील सोमय्या यांनी प्रबंध सादर केला होता. सोमय्या यांनी 30 सप्टेंबर 2022 रोजी त्यांची तोंडी परीक्षा दिली होती. मुंबई विद्यापीठाच्या प्रवक्त्याने म्हटलंय की नील सोमय्या यांच्या पीएचडीसाठीच्या नोंदणीपासून प्रबंध सादरीकरणापर्यंतचा अवधी हा 16 महिन्यांचा आहे, आणि हा कालावधी नियमांनुसारच आहे. विद्यापीठाच्या नियमांतील कलम 7, उपकलम 3 of VCD/ 947 of 2018 नुसार नोंदणीपासून पीएचडीचे सादरीकरण कमीत कमी एका वर्षाच्या आत होऊ शकते असे प्रवक्त्याने म्हटले आहे.