प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
माथेरान नगरपालिकेची रंगीत तालीम समजली जाणारी माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत शिवराष्ट्र पॅनलने पिसारनाथ पॅनलचा धुव्वा उडवत एकहाती सत्ता खेचून आणली.या पॅनलचे अजय सावंत हे सभापतिपदी तर विनंती घावरे या उपसभापती पदी विराजमान झाले आहेत.
स्वातंत्र्याचा ऐतिहासिक वारसा लाभलेली 1939 साली स्थापन झालेली माथेरान नागरी सहकारी पतसंस्था निवडणूक एकतर्फी झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या शिवराष्ट्र पॅनेलने काँग्रेस,बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट व भाजप पुरस्कृत पिसारनाथ पॅनलचा 13/0 ने धुव्वा उडवत एकही जागा न गमावता सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अजय सावंत यांची सभापती पदी वर्णी लागली असून उपसभापती पदी उद्धव ठाकरे गट शिवसेना यांच्या विनंती घावरे यांची बिनविरोध निवड झाली.
दुपारी 12 वाजता निवडणूक अधिकारी यांनी सभापती पदी अजय सावंत झाल्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर पतसंस्थेच्या बाहेर कार्यकर्त्यांच्या जमावाने एकच जल्लोष करत ढोलताश्याच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला.गेली 23 वर्षाचा पतसंस्थेत दांडगा अनुभव असल्याने या पतसंस्थेची इत्यंभूत माहिती असल्याने अजय सावंत यांच्या सभापती पदी नियुक्ती झाल्याने सर्वसामान्य सभासद व ठेवीदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.यावेळी अजय सावंत म्हणाले की निःपक्षपाती पणे काम करून संस्थेला आर्थिक सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असून सुरुवातीला एटीएम साठी प्रयत्न केले जाणार आहेत.
याप्रसंगी शिवसेना उद्धव ठाकरे गट शहरप्रमुख प्रसाद सावंत यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजेश दळवी यांनी यापूढे असेच जोमाने एकत्रित काम सुरू ठेवा असे कार्यकर्त्यांना आवाहन केले.यावेळी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.