स्वातंत्र्याची फळे सर्वांपर्यंत पोहोचावीत यासाठी क्रांतीअग्रणी लढले ---प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन



प्रेस मीडिया लाईव्ह :

माढा ता. २३ , आपल्या ऐन तारुण्यात क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात स्वतःला झोकून दिले आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.तसेच स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्याची आंदोलनाची सर्वसमावेशक विचारधारा व संविधानाची मूल्यव्यवस्था राबविण्यासाठी विविध क्षेत्रात अनमोल स्वरूपाचे काम केले.स्वातंत्र्याची फळे समाजाच्या शेवटच्या माणसांना चाखता आली पाहिजेत.त्यांची उन्नत्ती झाली पाहिजे यासाठी क्रांतीअग्रणी अखेरपर्यंत कार्यतर राहिले.तो विचार घेऊन पुढे जाणे महत्वाचे आहे, असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.



ते श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ ,निमगाव ( टें ) संचालित विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेम्भुर्णी ( ता.माढा जि.सोलापूर ) च्या वतीने आयोजित जाहीर व्याख्यानात " क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड यांचे स्वातंत्र्य आंदोलनातील योगदान " या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी माढ्याचे आमदार बबन (दादा) शिंदे होते.तर पुणे पदवीधरचे आमदार अरुण (अण्णा) लाड व करमाळ्याचे आमदार संजय ( मामा ) शिंदे हे प्रमुख उपस्थित होते. प्रास्ताविक व पाहुण्यांच्या परिचय प्राचार्य डॉ.महेंद्र कदम यांनी करून दिला.डॉ.राजेंद्र दास यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले , भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात प्रतिसरकारने एक महत्वाची भूमिका बजावली.ब्रिटिश साम्राज्यशाही प्रमाणेच एतद्देशीय गुन्हेगारी, दरोडेखोरी ,सावकारी, विघातक विकृती विरुद्ध लढण्यासाठी साताऱ्यात प्रतिसरकारची जून १९४३ मध्ये स्थापना झाली. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात साताऱ्याचे

प्रतिसरकार हे एक तेजस्वी पर्व होते.त्या प्रतिसरकार मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी बापू लाड यांनी अतिशय मोलाची भूमिका बजावली.ते आघाडीवरील योद्धे होते. मध्यवर्ती युद्धमंडळ, न्यायदान मंडळ, लष्करी प्रशिक्षण केंद्र, जनता कोर्ट, तुफान दल,आघात दल, चवळीसाठी निधी उभारण्यासाठी खजिना लूट, दारूबंदी ते अस्पृश्यता निर्मूलन अशा अनेक माध्यमातून जी.डी.बापूंनी  जे काम केलं ते आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही अतिशय महत्त्वाचे आहे.

प्रसाद कुलकर्णी पुढे,म्हणाले, अतिशय संघर्षशाली जीवन क्रांतीअग्रणी बापू जगले.एक धगधगता इतिहास त्यानी निर्माण केला.क्रांतीच्या मशालीने साम्राज्यवादी अंधार दूर करण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत अग्रणीपणे ते करत राहिले.देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात प्राणाची पर्वा न करता सहभागी झालेल्या बापूंची 'महाराष्ट्राचे  शिल्पकार ' या मालिकेतही आदराने नोंद घेतली जाते. सर्वसामान्य जनतेसाठी सरकारने कशी धोरणे राबवली पाहिजेत याचे उदाहरण स्वातंत्र्यपूर्व काळात प्रतिसरकारच्या माध्यमातून ,स्वातंत्र्य आंदोलनातून आणि स्वातंत्र्योत्तर काळात,शेती,पाणी,शिक्षण,सहकार, कष्टकरी, कामगार क्षेत्रासह विविध क्षेत्रातील अफाट कार्यकर्तृत्वातून बापूंनी दाखवून दिले. आपल्या दीड तासाच्या ओघवत्या शैलीतील भाषणात प्रसाद कुलकर्णी यांनी स्वातंत्र्य आंदोलन, प्रतिसरकार ,क्रांतीअग्रणी डॉ.जी. डी. बापूंचे कार्य आणि  वर्तमान काळात त्याचे महत्त्व याची सवित्तर व  सखोल  मांडणी केली.

आमदार अरुणअण्णा लाड म्हणाले,प्रतिसरकारच्या काळामध्ये क्रांतीअग्रणी जी.डी. बापू लाड यांनी वयाच्या वीस ते पंचवीशीत जे काम केले ते अतिशय प्रेरणादायी स्वरूपाचे होते.तन-मन धन अर्पण करत प्रतिसरकार आणि ब्रिटिश साम्राज्यशाही विरोधी लढा प्राणाची पर्वा न करता ते आपल्या सहकाऱ्यांसहित कार्यरत राहिले.अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची ती उर्मी आजच्या तरुणांनाही अंगीकारण्याची गरज आहे.

अध्यक्षस्थानावरून बोलतांना आमदार बबन ( दादा ) शिंदे म्हणाले,क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी.बापूंनी स्वातंत्र्य आंदोलनात आणि स्वातंत्र्यानंतर फार मोठ्या स्वरूपाचे काम केले.तोच वारसा घेऊन आमदार अरुण अण्णा काम करत आहेत.समाजाची सर्वांगीण उन्नती झाली पाहिजे हा ध्यास घेऊन ते कार्यरत राहिले आहेत.क्रांतीअग्रणीना जन्मशताब्दी निमित्त आदरांजली वहात असतांना त्यांच्या कार्यकर्तृत्वातुन सर्वानी प्रेरणा घेतली पाहिजे.

क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड जन्मशताब्दी निमित्त या व्याख्यानाचे आयोजन श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ,विठ्ठलराव शिंदे बहुद्देशीय सांस्कृतिक मंडळ, सोजरमाई बहुउद्देशीय विकास मंडळ,विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते.रमेश पाटील यांनी आभार मानले.डॉ.दिगंबर वाघमारे व रवी जाधव यांनी सूत्रसंचालन केले.ओम साईराज मंगल कार्यालय ( टेम्भुर्णी ) येथे झालेल्या या व्याख्यानास विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते,शिक्षक- शिक्षिका ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post