प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : पुण्यातील अट्टल गुंड गज्या मारणेच्या खंडणी प्रकरणात कोल्हापूर मधील सराईत गुन्हेगार प्रकाश बांदिवडेकरला पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले आहे.इंदूरमध्ये त्याला ताब्यात घेण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात गाजलेल्या 'खूनाच्या बदल्यात खून' प्रकरणातील प्रकाश बांदिवडेकर सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खून, खंडणी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. गुंड गज्या मारणेच्या टोळीने 8 ऑक्टोबर 2022 रोजी एका व्यावसायिकाचे अपहरण करीत 20 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.
या प्रकरणात गज्या मारणे, रुपेश मारणे, सचिन घोलप, अमर किर्दत, हेमंत पाटील, फिरोज शेख व अन्य साथीदारांवर अपहरण, मारहाण, खंडणी, जिवे मारण्याची धमकी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी चार जणांना अटक केली होती, त्यानंतर गज्या मारणे व त्याच्या 13 साथीदारांवर "मोका" नुसार कारवाई करण्यात आली होती. खंडणी प्रकरणानंतर गुंड गज्या मारणे पसार झाला आहे. त्याला पकडण्यासाठी गुन्हे शाखेकडून शोध सुरु आहे.
या प्रकरणात आणखी सहभागींचा शोध घेत असताना प्रकाश बांदिवडेकरचा सहभाग असल्याचे उघड झाल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने त्यास इंदूर येथून ताब्यात घेतले. मारणेला आश्रय देणाऱ्यांना मोका कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे.
खूनाच्या बदल्यात खून
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यामधील चंदगड तालुक्यातील नागनवाडी येथील बांदिवडेकर कुटुंबामध्ये अनेक वर्षांपासून शेती आणि प्रतिष्ठेवरून वाद सुरु होता. त्यातून एकापाठोपाठ एक नऊ जणांना जीव गमवावा लागला होता. या कुटुंबामध्ये डॉक्टर, इंजिनिअर, वकील, असे अनेक नामवंत सुशिक्षित होते. हे रक्तरंजित सूडसत्र थांबवण्यासाठी तत्कालीन कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक माधव सानप यांनी या कुटुंबात सलोखा घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता.