कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांगांना बोगस ओळखपत्र देऊन फसवणूक होत असल्याचा खळबळजनक प्रकार शुक्रवारी उघडकीस

 कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांचा बनावट शिक्का तयार करून वापरण्यात आला आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांगांना बोगस ओळखपत्र देऊन फसवणूक होत असल्याचा खळबळजनक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला.या साठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांचा बनावट शिक्का तयार करून वापरण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेकडे प्राप्त झालेले बोगस ओळखपत्रावर बसाप्पा आण्णाप्पा गुंडली (वय ५६) असे नाव आहे. या व्यक्तीचे अपंगत्व ५० टक्के असून, त्यांना हे ओळखपत्र कायमस्वरुपी दिले आहे. गंमत म्हणजे शुक्रवार, दि. १४ ऑक्टोबर असताना हे ओळखपत्र दिल्याची तारीख मात्र १५ ऑक्टोबर २०२२ अशी लिहिली आहे. पूर्वी समाजकल्याण कार्यालयातर्फे अशी कार्ड दिली जात होती, त्यातील शिल्लक कार्ड कुणाच्या हाताला लागली आहेत की काय, अशीही शंका व्यक्त होत आहे. कारण पूर्वी हे पद समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद होते. तसाच शिक्काही आहे. आता त्या पदाचे नाव जिल्हा समाजकल्याण अधिकारी (जिल्हा परिषद) असे आहे. ज्याला हे कार्ड मिळाले आहे, त्यांचा शोध घेतल्यास हे कार्ड कुणी व कुठे तयार करून दिले, याचा शोध घेणे शक्य आहे.

याबाबत जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे म्हणाले, दिव्यांगांना देण्यात येणारे समाज कल्याण विभागाचे ओळखपत्र शासनाने रद्द करून २ ऑक्टोबर २०१८ पासून वैश्विक ओळखपत्र बंधनकारक केले आहे; परंतु काहीजण पैसे घेऊन दिव्यांगांना बोगस ओळखपत्र देत आहेत. त्यावर शिक्का आणि सही बोगस आहे, अशी ओळखपत्रे वाटप चालू असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारची ओळखपत्रे आता रद्द झाली असून, ती देण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला नाही. या ओळखपत्रांचा कोठेही उपयोग होत नाही, याची सर्व दिव्यांगांनी नोंद घ्यावी. या पद्धतीने दिव्यांगाचे ओळखपत्र देण्यासाठी कोणी आर्थिक मागणी केली असल्यास त्यांना पोलीस विभागात तक्रार करून पकडून द्यावे. जेणेकरून दिव्यांगाची आर्थिक फसवणूक होणार नाही, असे आवाहन घाटे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post