प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी / प्रतिनिधी
प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणजे जगाच्या सनाथपणाची करुणा भाकणारे एक आदर्श माणूस आहेत. अनाथीपणाच्या तिरस्कारयुक्त दलदलीत वाढलेला हा माणूस जगाकडे घृणेने नव्हे तर सहृदयतेने, प्रेमाने बघतो. सकारात्मकतेने पाहतो. विचार आणि आचरणातील एकवाक्यता या व्यक्तिमत्वात ठायी ठायी भरलेली आहे. शिक्षणापासून समाज कार्यापर्यंत आणि साहित्यापासून वस्तुसंग्रहालयांच्या निर्मितीपर्यंत त्यांनी बहुविध क्षेत्रात केलेलं कार्य ही फार मोठी सामाजिक व सांस्कृतिक श्रीमंती आहे, असे मत नव्या पिढीचे दमदार साहित्यिक प्रा.डॉ.रफिक सूरज यांनी केले.
ते समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने आयोजित व्याख्यानात ' प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे : जीवन व कार्य ' या विषयावर बोलत होते.प्राचार्य ए.बी.पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्तविक केले.त्यातून प्राचार्य डॉ. लवटे यांच्या कोल्हापूरात होणाऱ्या नागरी सत्कारास सर्वानी यावे असे आवाहन केले.
प्रा.डॉ.रफिक सूरज म्हणाले, स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्याचा विचार करत असताना मला चार आश्चर्याची केंद्र दिसतात.ती म्हणजे कवित्री बहिणाबाई ,अण्णाभाऊ साठे ,नारायण सुर्वे आणि प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे ही आहेत. याचं साहित्य वाचल्यावर आपल जगणं बदलून जाते. या मंडळींच्या वाट्याला बालपणी जे वातावरण आलं आणि त्यातून त्याने स्वतःला हे घडवलं हे खरच कमालीचं आश्चर्यकारक आहे. विविध क्षेत्रात सातत्यपूर्ण व दिशादर्शक काम त्यांनी केले. शंभरावर पुस्तकांचे लेखन,अनेक केलेले अनुवाद ,अनेक संस्थांची केलेली उभारणी व त्यात दिलेले योगदान हे सर्व पाहिल्यानंतर त्यांच्या माणुसकेंद्री जीवनकार्याचे महत्व कळते. महात्मा गांधी यांच्यापासून साने गुरुजीपर्यंत अनेकांचा प्रभाव या व्यक्तिमत्त्वावर आहे. जगणं आणि लिहिणं यात कमीत कमी अंतर असणार हे अंतरबाह्य मानवतावादी व्यक्तिमत्त्व आहे.आपल्या ओघवत्या व अभ्यासपूर्ण भाषणात डॉ.सूरज यांनी प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे यांच्या जीवन व कार्याची अनेक उदाहरणे देत मांडणी केली.या कार्यक्रमास प्रा.रमेश लवटे,प्राचार्य ए.बी.पाटील,प्राचार्य डॉ.बी.एस.पाटील,अन्वर पटेल,रामदास कोळी, पांडुरंग पिसे,अजित मिणेकर,अशोक केसरकर, देवदत्त कुंभार,तुकाराम अपराध, नौशाद शेडबाळे,नौशाद जावळे,अशोक माने,यांच्यासह अनेक जिज्ञासू उपस्थित होते.