प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी / प्रतिनिधी
अंगणवाडी सेविका या बालकांच्या आदर्श गुरु आहेत , असे उद्गार शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी काढले. बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी विभाग कोल्हापूर इचलकरंजी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पोषण महा सांगता समारंभात ते बोलत होते. रोटरीचे अध्यक्ष सत्यनारायण धूत, सचिव प्रकाश गौड, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ मिरजकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
घरातील साहित्य वापरून पौष्टिक पदार्थ, बालकांची वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा आणि युवती महिला व पालकांचा उत्साही सहभाग अशा वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. येथील घोरपडे नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात दिवसभर विविध कार्यक्रम झाले.कार्यक्रमास अडीचशे अंगणवाडीच्या शिक्षिका उपस्थित होत्या.
उद्घाटन कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील यांनी केले. नागरी भागात विशेषता इचलकरंजी शहरात अंगणवाडीच्या शिक्षिका व सेविका कशा समर्थपणे काम करीत सामाजिक संतुलनासाठी कार्यरत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पोषण आहार बाबत अत्यंत सक्रियपणे काम करून सर्वच भागात याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागरण केल्याचे त्यांनी सांगितले. रोटरीचे अध्यक्ष श्री.धुत यांनी यापुढील काळात अंगणवाडीच्या प्रकल्पासाठी रोटरी नेहमीच सहकार्य करेल असे आश्वासन दिले. तर रोटरीचे सचिव गौड यानी अंगणवाडी शिक्षकांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करून विविध देशात कोणत्या पद्धतीने बालकांचे संगोपन आणि संरक्षण केले जाते याची माहिती दिली.
पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी अंगणवाडी शिक्षिका समाजातील शेवटच्या थरापर्यंत पोहोचून तेथील सामाजिक स्वास्थ राखण्यासाठी कशा पद्धतीने समर्थपणे काम करतात याबाबतची माहिती देऊन त्यांचे कौतुक केले. यापुढील काळात बालक संरक्षण आणि अन्य उपक्रमात या विभागाचे सहकार्य नक्कीच मिळत राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. बालविवाह रोखण्यात त्याचबरोबर संबंधित कुटुंबांचे समुपदेशन करण्यात बालविकास प्रकल्प विभाग अत्यंत सक्षमपणे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या मार्फत योगासनाची प्रात्यक्षिके, बाळाच्या वाढीची त्रिसूत्री आणि विकासाची सूत्रे याबाबत प्रबोधन, पुरुष पालकांचा मूक अभिनय, किशोरी अभिव्यक्ती अंतर्गत मासिक पाळी व्यवस्थापन व अनिमिया या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले तसेच आर्ट ऑफ लिविंग च्या वतीने ही दैनंदिन तणाव्यवस्थापनासाठी ध्यान साधना याबाबतची माहिती अंगणवाडी सेविकांना देण्यात आले. आभार श्रीमती जे एस बोधेकर यांनी मानले.