ता . दौंड : हाजबे खोमणे वस्तीकडे जाणारा वहीवाटीचा रस्ता तलावाच्या पाण्यात

शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

वासुंदे (ता. दौंड) येथील हाजबे खोमणे वस्तीकडे जाणारा वहीवाटीचा रस्ता तलावाच्या पाण्यात गेल्याने शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

तसेच शेतकरी व वयोवृद्ध नागरिकांना याच पाण्यातून वहिवाट करावी लागत असल्याने स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वासुंदे परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने परिसरातील सर्वच तलाव जवळपास पुर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. परिणामी तलावाच्या खालील बंधारे, ओढे नाले हेही काठोकाठ भरले आहेत. मात्र येथील जगताप तलावातील पाण्याने हाजबे खोमणे वस्तीकडे जाणारा वहीवाटीचा रस्ता आपल्या कवेत घेतल्याने शालेय विद्यार्थ्यांसह सर्वांचीच मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे हा रस्ता संबंधित शासकीय यंत्रणेने वाहतूकीसाठी खुला होण्याबाबत योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा या ठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी या रस्त्याच्या अडचणी शासकीय यंत्रणेने ताबडतोब सोडवाव्यात अशी मागणी स्थानिक शेतकरी व पालकांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post