इमारती, घर आणि काही कार्यालयांमध्ये पाणी घुसल्याच्या घटना घडल्या. 25 ठिकाणी पाणी शिरले असून, 12 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : पुणे शहरात रविवारी सायंकाळी तब्बल दोन तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठले. त्यामुळे इमारती, घर आणि काही कार्यालयांमध्ये पाणी घुसल्याच्या घटना घडल्या. 25 ठिकाणी पाणी शिरले असून, 12 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या.तर दोन ठिकाणी भिंत पडल्याची घटना घडली. अग्निशामक दलाच्या वतीने झाडे तोडून रस्ता मोकळा करण्यात आला असून, पाणी घुसलेल्या इमारतीमध्ये मदतकार्य करण्यात येत आहे.
नेहमीप्रमाणे काल झालेल्या जोरदार पावसामुळे चंदननगर पोलिस ठाण्यात पाणी घुसले. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. कोथरूड परिसरातील वेदभवन, वनाजजवळ कचरा डेपो, पाषाण येथील लमाण तांडा, सोमेश्वर वाडी, वानवडी येथील शितल पेट्रोल पंप, बीटी कवडे रोड आणि कात्रज उद्यानासह विविध ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. तर पाषाण येथील एनसीएल, कोंढवा परिसरातील साळुंखे विहार आणि ज्योती हॉटेलसमोर, चव्हाणनगर आणि रूबी हॉल समोर झाडपडीच्या घटना घडल्या. त्यामध्ये काही वाहनांचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. रस्त्यावर पडलेली झाडे तात्काळ बाजूला करून वाहतुक सुरळीत करण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान आणि वाहतुक पोलिस घटनास्थळी उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
दरम्यान, मुठा नदी पात्राशेजारील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशानाकडून देण्यात आल्या आहेत. "वाढत्या पावसामुळे खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सायंकाळी सात वाजता 856 क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
राज्यभर मुसळधार
गेल्या दोन दिवसांपासून राज्यभर पाऊस सुरू झालाय. पुण्यासह, औरंगाबाद, जळगाव, सातारा, कोल्हापूर, येथे मुसळधार पाऊस पडतोय. कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलीत दवाजे उघडले आहेत. त्यामुळे पंचगंगा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.