विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांची घेतली भेट.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई / पुणे दि.१० : विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या दि.१२ सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो याचे औचित्य साधून शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली. यानिमित्ताने महात्मा फुले यांचे मुंडासे, शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक तसेच घोंडगी आणि काठी हे श्री ठाकरे यांना डॉ.गोऱ्हे यांनी भेट दिली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्याने महाराष्ट्रात वाढत आहेत.
यापार्श्वभूमीवर गेली वीस वर्षे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे शेतकऱ्यांच्या बरोबर अतिसंवेदनशील पध्दतीने काम करत आहेत ते अधिक त्यांच्या हातून कार्य घडावे अशा प्रकारच्या शुभेच्छा डॉ.गोऱ्हे यांनी श्री ठाकरे यांना दिल्या. यावेळी श्री ठाकरे यांनी डॉ.गोऱ्हे यांना चांगल्या प्रकारचे सतत यश मिळावे व हातून समाज हिताचे कार्य घडावे अशा शुभेच्छा दिल्या. शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशा भावना श्री ठाकरे यांनी व्यक्त केल्या.
या प्रतिकात्मक भेटी मागची भूमिका स्पष्ट करताना डॉ.नीलमताई म्हणाल्या, महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण, एकाच वेळी ओला दुष्काळ आणि अपुरा पाणी पुरवठा याच्या कात्रीत सापडलेला शेतकरी आणि शेतीच्या सर्वांगीण विकासाकडे होणारे शासनाचे दुर्लक्ष; यावर उपाय म्हणून महात्मा फुल्यांनी तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर ओढलेला आसूड आज परत हातात घेण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.
या दृष्टीने गेली वीस वर्षे शेतकऱ्यांचे विविध प्रश्न अत्यंत संयमाने आणि संवेदनशीलतेने हाताळणाऱ्या मा. उद्धवजींनी शेतकऱ्याचा आसूड हातात घ्यावा अशी प्रार्थना यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी केली.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. गोऱ्हे यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचे महत्व अधोरेखित करताना महाराष्ट्रात असलेल्या शेतकरी समस्या, स्त्री-सुरक्षा आदी विषयांवर लक्ष वेधले.
यावेळी, शिवसेना पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख आनंद गोयल, प्रशांत राणे, महिला सहसंपर्क प्रमुख विजया शिंदे, महिला शहरसंघटिका सविता मते, माजी नगरसेविका संगीता ठोसर, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट, युवासेना सहसचिव शर्मिला येवले आदी जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते