प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई – गुन्हे दाखल करणे आणि विरोधकांना अटक करणे हाच सध्या केंद्र सरकारचा फ्लॅगशिप प्रोग्रॅम झाला आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. आज येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आजचे वृत्तपत्र तपासले तर त्यात केंद्रीय तपास यंत्रणांनी विरोधी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवरील कारवाई कशी वाढवली आहे याचा विस्तृत तपशील देण्यात आला आहे.
गुन्हे दाखल करणे आणि विरोधी नेत्यांना अटक करणे यांच्यावरच केंद्र सरकारचे सध्या लक्ष केंद्रित झालेले दिसते आहे असे ते म्हणाले. जेव्हा त्यांना विजयाची खात्री नसते त्यावेळी अशी पावले उचलली जातात असेही त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारच्या या भूमिकेला आम्ही राजकीय प्रत्युत्तर देऊ, असेही पवारांनी म्हटले आहे.
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शरद पवारांचीही भूमिका तपासली पाहिजे, असे विधान भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केले होते त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे प्रतिपादन केले. भातखळरांच्या आरोपावर ते म्हणाले की आरोप केलेत ना आता ताबडतोब चौकशी करा पुढच्या आठ दिवसांत ही चौकशी करा आणि त्यात जर काही निघाले नाही तर आरोप करणाऱ्याच्या संबंधात राज्य सरकारची भूमिका काय असेल तेही स्पष्ट करा असे आव्हान त्यांनी भाजप नेत्यांना दिले.