राष्ट्र धर्माचे जागरण महत्वाचे ब्रिगेडीयर सुनील लिमये (नि) यांचे मत : बंधुभाव भाईचारा पुरस्काराचे वितरण

 अखिल मंडई मंडळ आणि उम्मत संस्था यांच्या वतीने आयोजन

मुस्लीम बांधवांच्या हस्ते गणरायाची आरती आणि शिरखुर्मा प्रसादाचे वाटप


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : सैन्यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक देशसेवेच्या भावनेने लढण्यासाठी सज्ज असतात. कोणताही जात धर्म सैन्यामध्ये नसतो. भारतीय हा एकच धर्म सैन्यात पाहायला मिळतो.  गणेशोत्सवाच्या माध्यमातून होणारे देशभक्तीचे, सामाजिक ऐक्याचे जागरण, सद्यःस्थितीत पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. समरसतेचे अंगण ठरणारा हा उत्सव, व्यापकतेने, सर्व जगात पोचला आहे, ही बाब निश्चितच लक्षणीय आहे. उत्सवाच्या माध्यमातून होणारे राष्ट्र धर्माचे जागरण महत्त्वाचे आहे,  असे मत ब्रिगेडीयर सुनील लिमये (नि) यांनी व्यक्त केले.

अखिल मंडई मंडळ आणि उम्मत सामाजिक संस्था, बंधुभाव भाईचारा फाउंडेशन यांच्यावतीने बंधुभाव भाईचारा पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू मुस्लीम एकता जोपासत वर्षांनुवर्षे गणरायाची सेवा करणाऱ्या गणेशभक्त कार्यकर्त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.  नजीरभाई तांबोळी, अब्दुल रौफ शेख, आसीफ शेख, जावेद चौधरी, सुरैया शेख यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शुक्रवार पेठेतील अखिल मंडई मंडळाच्या समाजामंदिरात कार्यक्रम झाला. यावेळी ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खान, शिक्षणतज्ञ डॉ. पी.ए. ईनामदार, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, कोषाध्यक्ष संजय मते, विश्वस्त विश्वास भोर, राजेश कराळे, सुरज थोरात, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, उम्मत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जावेद खान उपस्थित होते.

उस्ताद उस्मान खान म्हणाले, पुण्याच्या गणेशोत्सवाकडे जगभरातील लोक अभिमानाने पाहतात. पूर्वी गणपती उत्सव म्हणजे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्यासपीठ होते. त्यामुळे विविध जाती-धर्माचे कलाकार एकत्र येऊन आपली सेवा गणरायाला अर्पण करायचे. कलेला कोणताही धर्म नसतो. धर्म कोणताही असो, आपण भारतीय आहोत असे प्रत्येकाला वाटायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

डाॅ. पी.ए.ईनामदार म्हणाले, कोणतीही परिस्थिती आली तरी आपण सगळे भारतीय आहोत. प्रत्येक धर्मात अट्टाहास करणारे लोक आहेत. परंतु बहुसंख्य लोक हे आपण सर्व एक आहोत असा विश्वास ठेवणारे आहेत. कोणत्याही चुकीच्या विचारांना थारा देऊ नका. भाषावाद - प्रांतवाद यामध्ये अडकून न राहता एकमेकांच्या सहाय्याने देशाला पुढे आणूया. 

अण्णा थोरात म्हणाले, अखिल मंडई मंडळ नेहमीच सामाजिक बांधिलकीतून सर्वधर्म समभाव जपत असते. हिंदू-मुस्लीम हे धर्माने जरी वेगवेगळे असले तरी भारतीय म्हणून आपण सर्व एकच आहोत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोख्याचा हा संदेश देण्यासाठी या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन केले जाते. 

कार्यक्रमाचे संयोजन उम्मत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जावेद खान आणि साबीर शेख यांनी केले होते. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले. जावेद खान यांनी आभार मानले. 

फोटो ओळ - अखिल मंडई मंडळ आणि उम्मत सामाजिक संस्था, बंधुभाव भाईचारा फाउंडेशन यांच्यावतीने बंधुभाव भाईचारा पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. . शुक्रवार पेठेतील अखिल मंडई मंडळाच्या समाजामंदिरात कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थित पुरस्कारार्थी आणि मान्यवर.

Post a Comment

Previous Post Next Post