रेल्वे प्रशासनाने याबाबत तातडीने उपाययोजना करावी...खासदार गिरीश बापट
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे – रेल्वे स्टेशनवर पार्किंगची व्यवस्था अपूर्ण आहे , रेल्वे प्रशासनाने याबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशा सूचना खासदार गिरीश बापट यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत दिल्या.
रेल्वे स्टेशनवर खासगी वाहनांनी जाणाऱ्यांची प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी, रेल्वे व पोलीस प्रशासनावर ताण, नागरिकांना वेळेवर पोहोचण्यास उशीर आणि आर्थिक-मानसिक त्रास सहन करावा लागतो. तसेच पुणे शहरासह उपनगरेही झपाट्याने विकसित होत असून नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले केवळ पुणे रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून खडकी येथे टर्मिनल विकसित केल्यास पुणे स्टेशनवरील ताण कमी होईल, असे बापट यांनी यावेळी सांगितले.
हडपसर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना सुविधा उपलब्ध कराव्यात. रस्ते विकसित करावे, रेल्वेने येणाऱ्या व इतर प्रवाशांसाठी पीएमपी बस सुरू करावी, मिरज रेल्वे लाइनवर घोरपडी परिसरात आरओबी बांधण्यासाठी रेल्वेची जमीन महानगरपालिकेला हस्तांतरित करावी, आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे बापट यांनी सांगितले. याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, पुणे रेल्वे विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा व रेल्वेचे इतर अधिकारी उपस्थित होते.