प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : करोनानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे राज्यभरात अनंत चतुर्दशीचा उत्साह असून गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. पुण्यातही विसर्जन निवणुकांचा थाट पाहायला मिळत आहे. दरम्यान, विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये फक्त सर्वसामान्यच नाही, तर राजकीय नेत्यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे पाहायला मिळत आहे. यात शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी देखील हजेरी लावली. यावेळी त्यांनी राजकीय विषयावर बोलण्यास टाळले मात्र एका वाक्यात उत्तर देत भाजपला टोला लगावला आहे.
यावेळी बोलताना,”दोन वर्ष कोविडचे निर्बंध होते, म्हणूनच आपण आज सण साजरे करू शकतो. जर निर्बंध नसते तर उत्तर प्रदेशात जे घडले तेच इकडे घडले असते. लोकांचा जीव महत्त्वाचा आहे, असे मत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. पुण्यातील गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये ते सहभागी झाले, त्यावेळी त्यांनी पुण्यातील गणेशोत्सव अनुभवला. आतापर्यंत टीव्हीवर पाहत होतो. यावेळी प्रत्यक्ष उत्साह पाहायला मिळाला, असे ते म्हणाले.
तसेच पुढे बोलताना,”कोविडचा काळ होता. संपूर्ण जगासाठी कठीण काळ होता. सगळीकडे निर्बंध होते. जीव वाचवणे याला प्राथमिकता होती. तेच महत्त्वाचे होते. आज कोविड मागे पडला आहे, त्यामुळे आपले सर्वच सण उत्साहात साजरे होत आहेत. पुण्यातील मिरवणुका तर खूप मोठ्या असतात. याच मिरवणुका पाहायला आज आलो आहे. आनंद आहे, उत्साहाचे वातावरण आहे,” असे ते यावेळी म्हणाले.
आज गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस आहे. त्यामुळे सण-उत्सवाच्या अशा प्रसंगी राजकारणावर बोलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकारणावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली. गेले अनेक महिने महापालिकांवर प्रशासक आहे. निवडणुका होणे गरजेचे आहे. वेगवेगळे प्रश्न उद्भवत असतात. मंत्र्यांना बंगले मिळाले आहेत, मात्र पदभार अद्याप घेतला गेला नाही. पालकमंत्रीदेखील अजून कुठलेही घोषित झालेले नाहीत. पालकमंत्री हे पद अत्यंत महत्त्वाचे असते, जिल्ह्यासाठी गरजेचे असते. त्यामुळे ते घोषित व्हावे, अशी मागणी त्यांनी या निमित्ताने केली आहे.