प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : आमदार माधुरी मिसाळ आणि त्यांचे दीर माजी नगरसेवक दीपक मिसाळ या दोघांच्याही मोबाईलवर संपर्क साधून त्यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पैसे दिले नाही तर जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी घोरपडी गाव परिसरात वास्तव्याला असलेल्या एका तरुणाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माजी नगरसेवक दीपक धोंडिबा मिसाळ यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी इम्रान समीर शेख (रा. विकासनगर, घोरपडीगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी दीपक मिसाळ यांचा मोबाइल तसेच त्यांची भावजय आमदार माधुरी मिसाळ यांनी जनसंपर्कासाठी उपलब्ध करुन दिलेल्या मोबाइल क्रमांकावर आरोपी शेखने संदेश पाठवून खंडणीची मागणी केली. सुरुवातीला त्यांनी संदेशाकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यांच्या मोबाइल क्रमांकावर पुन्हा संपर्क साधून पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत मिसाळ यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. पोलिसांनी तपास सुरू केला.
तपासात मोबाइल क्रमांक समीर शेख याच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. शेख याच्या विरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी शेख याच्या विरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती तपासात मिळाली आहे.