प्रेस मीडिया लाईव्ह :
मौलाना सादिक मजाहिरी
पुणे : कर्तव्यात कसूर करुन आऱोपीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यांना दौंड न्यायालयाने दणका दिला आहे. पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर दौंड न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.मोरगाव इथे चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या मालकीची शेकडो एकर जमीन आहे. यातीलजमीन खरेदी विक्री प्रकरणात पोपट तावरे यांनी फसवणूक केल्याची तक्रार किरण भोसले आणि आरती लव्हटे यांनी केली होती. परंतु पोलिसांनी या प्रकरणात पोपट तावरे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तत्कालीन पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर, यवत पोलीस स्टेशनचे तात्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील तसेच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पी. आर गंपले यांच्यासह पोपट उर्फ कैलास तावरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. किरण भोसले आणि आरती लव्हटे यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यावरुन हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जमीन खरेदी-विक्रीच्या फसवणुकीवरुन तावरे यांच्यासह केरबा लव्हटे, रामदास लव्हटे, लक्ष्मण लव्हटे आणि जनाबाई लव्हटे यांच्याविरोधात आरती लव्हटे आणि किरण भोसले यांनी यवत पोलिसांकडे फिर्यादी दिल्या होत्या. कारण बारामती तालुक्यातील क्षेत्र असले तरी त्याची खरेदी मात्र दौंड तालुक्यातीलच दुय्यम निबंधक कार्यालयात होते. या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.इतरांवर कारवाई करताना मात्र या गुन्ह्यात पोपट तावरे यांना वाचवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला, अशी तक्रारदारांची तक्रार होती. दुसरीकडे तक्रारदाराचे साक्षीदार न घेता आरोपीलाच वाचवण्याचा प्रयत्न करत त्याला अनुकूल साक्षीदारांचे जबाब घेऊन खोटी फिर्याद असल्याचे पोलिसांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि आरोपीने तोपर्यंत अटकपूर्व जामीन घेतला. त्यामध्ये पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली असा आरोप करत त्यामुळे आरती लव्हटे आणि किरण भोसले यांनी न्यायालयात खासगी फौजदारी दावा दाखल केला.
तसेच सुरुवातीला या पोलीस अधिकाऱ्यांसमोर आरोपीविरोधात पुरावा असताना देखील आरोपी पोपट उर्फ कैलास तावरे यांच्याशी संगणमत करुन त्याला मदत करण्याच्या हेतूने जाणून-बुजून खोटा अहवाल पाठवणे तसंच फिर्यादी याची फसवणूक करणे आणि पोलीस अधिकारी यांचे कायदेशीर कर्तव्यामध्ये कसूर करणे या आणि अशा कारणास्तव तक्रारदार यांनी ॲड.राजेश कातोरे आणि ॲड.अमित काटे यांच्यामार्फत तक्रार दाखल केली होती. यावर आता कोर्टाने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याआधीसुद्धा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचं कोर्टाने सांगितले आहे. 420, 464, 120ब, 192,196 कलम अंतर्गत गुन्हा नोंद करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.