प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : पुणे पोलीस आयुक्तालय हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यांना असलेल्या महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ कलम ३६ च्या अधिकारान्वये १० सप्टेंबर २०२२ च्या मध्यरात्रीपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांना विविध अधिकार प्रदान केले आहेत.
यानुसार रस्त्यावरुन जाणाऱ्या अगर मिरवणुकीतील व्यक्तींचे वागणे अगर कृत्य या बाबत निर्देश देणे, मिरवणूका किंवा जमाव कोणत्या मार्गाने जाईल अगर जाणार नाही असे मार्ग व वेळा निश्चित करणे, सार्वजनिक ठिकाणी अगर सार्वजनिक करमणुकीच्या कार्यक्रमाच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या ध्वनीक्षेपकाची (लाऊड स्पीकर) वेळ, पद्धती, ध्वनी तीव्रता, आवाजाची दिशा यांचे नियंत्रण करणे, सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविताना उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन होण्याच्या अनुषंगाने लेखी किंवा तोंडी निर्देश देण्याचे अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
हे आदेश शासनाने सूट दिलेले दिवस वगळता उर्वरित कालावधीत लागू राहतील. या आदेशांचा भंग करणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम १३४ नुसार शिक्षेस पत्र राहील असेही आदेशान्वये कळवण्यात आले आहे.