प्रेस मीडिया लाईव्ह :
राज्य सरकारने नुकताच जनतेतून सरपंच निवडीचा घेतलेला निर्णय अभिनंदनीय आहे. मात्र, फक्त सरपंचांचीच नव्हे तर थेट मुख्यमंत्र्यांची निवड सुद्धा जनतेतून व्हावी, असा निर्णय सरकारने घ्यावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.राज्य सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत बोलताना हजारे यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
आपण सुद्धा आमच्या मागणीस पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली होती. त्यावेळी हजारे यांनी सुद्धा माजी मुख्यमंत्री ठाकरे यांना आपण घेतलेला निर्णय योग्य नसून जनतेतून सरपंच निवडणे हे खऱ्या अर्थाने लोकशाहीचे खरे लक्षण आहे, असे पत्राद्वारे कळविले होते. मागील ठाकरे सरकारने घेतलेला निर्णय नुकतेच राज्यात सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बदलला आहे. आता पुन्हा या सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सरपंच परिषदेने स्वागत केले आहे. मात्र या निर्णयात आमची आंदोलने व मागणी कारणीभूत आहे, असे असले तरीही हजारे यांनी आमच्या मागणीस दिलेला पाठिंबा व सरकारकडे पत्राद्वारे केलेली मागणी ही सुद्धा महत्वाची आहे. त्याची आठवण व हजारे यांचे आभार मानण्यासाठी सरपंच परिषदेचे सर्व सदस्य राळेगणसिद्धी येथे आले होते.
यावेळी हजारे यांनी सरपंच नव्हे तर थेट मुख्यमंत्रीची निवड सुद्धा त्या जनतेतून करणे गरजेचे आहे. तसे झाले तर खऱ्या अर्थाने लोकशाही अवतरेल, असे प्रतिपादन केले. सरपंच निवड जरी थेट जनतेतून होणार असेल तरीसुद्धा सरपंचांनी सुद्धा कोणतेही निर्णय घेताना ग्रामसभेला विश्वासात घेऊन घेतले पाहिजेत तरच खऱ्या अर्थाने थेट जनतेतून सरपंच निवडीच्या सरकारच्या निर्णयाला खऱ्या अर्थाने लोकशाहीचा निर्णय आहे, असे म्हणावे लागेल, असे सांगितले.