प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले आहे. 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करत असताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आला होता.हृदयामध्ये अनेक ब्लॉकेजेसचा अहवाल समोर आल्यानंतर दिल्ली एम्सच्या डॉक्टरांच्या टीमने राजू यांची अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. अखेर, गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजू श्रीवास्तव यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
राजू श्रीवास्तव यांच्या निधनाची बातमी समोर आल्यापासून संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. सर्वजण पाणावलेल्या डोळ्यांनी राजू श्रीवास्तव यांना आदरांजली वाहत आहे. राजू श्रीवास्तव यांच्या अचानक निरोपाने सर्वांनाच धक्का बसला आहे. बॉलिवूड आणि टीव्ही कॉरिडॉरमध्ये शोककळा पसरली आहे. या बातमीवर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर पाणावलेल्या डोळ्यांनी कॉमेडियनची आठवण करत आहेत.
नेहमी हसतमुख दिसणारा चेहरा, मग तो टीव्ही स्क्रीनवर असो किंवा सोशल मीडिया अकाऊंटवर, आपल्या उत्कृष्ट विनोदबुद्धीमुळे करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या राजूचा निरोप घेणे धक्कादायक आहे. मनोरंजन क्षेत्रात राजू श्रीवास्तव उणीव कोणीही भरून काढू शकणार नाही.
राजू श्रीवास्तव स्वतःच्या फिटनेसची खूप काळजी घेत असत. राजू यांनी जिम आणि वर्कआउट करणे कधीच चुकवले नाही. ते सोशल मीडियावर खूप सक्रिय होते. आणि चाहत्यांना हसवण्याचा त्यांचा नेहमीच उद्देश होता. राजू यांचा इन्स्टा अकाउंटवर तुम्हाला अनेक मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतील. राजू श्रीवास्तव आता या कॉमिक व्हिडिओंच्या माध्यमातून चाहत्यांच्या आठवणीत राहणार आहेत.