कर्ज प्रकरणे निर्गत करुन नवीन उद्योगांना चालना द्या -जिल्हाधिकारी राहुल रेखावार



प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर :  (जिमाका) : सर्वसामान्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन बँकांनी सणांच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित कर्ज प्रकरणे मंजूर करुन नवीन उद्योगांना चालना द्या, असे निर्देश देऊन वार्षिक पतपुरवठा आराखड्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी योग्य नियोजन करा, अशा सूचना  जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.

   जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला बँक ऑफ इंडिया कोल्हापूरचे उपविभागीय व्यवस्थापक किरण पाठक, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास, नाबार्ड चे आशुतोष जाधव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे आदी उपस्थित होते.

 अण्णासाहेब पाटील महामंडळ व्याज परतावा योजनेत कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर असून आणखी जोमाने काम करुन या आर्थिक वर्षाचेही उद्दिष्ट साध्य करुन जिल्हा आघाडीवर राहण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी सांगितले. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजने अंतर्गत गत वर्षीप्रमाणेच यावर्षी देखील कोल्हापूर जिल्हा कर्ज मंजूरीत राज्यात आघाडीवर असून  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्येही याचपद्धतीने वाटचाल करावी, अशा सूचना त्यांनी सर्व बँकाना केल्या. 

ग्राहकांना केसीसी दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, कृषी पायाभूत विकास निधी (AIF), प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना(PMFME), पीएमइजीपी, सिएमइजिपी, महामंडळाच्या योजना अशा योजनांचा लाभ देऊन नवनवीन व्यवसाय उभारणीस प्रोत्साहन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी दिल्या.

सर्व बँकांचा आढावा घेऊन सर्व योजनांचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. 

 यावेळी विविध विभागातील अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व सभासद बँका व वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  

   वार्षिक पतपुरवठा आराखडा 2022-23 अंतर्गत जून 2022 अखेर 8708 कोटींचा कर्जपुरवठा झाला असल्याचे अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. गोडसे यांनी सांगितले. यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये 1777 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले असून एमएसएमई क्षेत्राला 2517 कोटीचे वाटप झाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात खरीप हंगामात पीक कर्जा अंतर्गत 1438 कोटीचे वाटप झाले असून 94 टक्के उद्दिष्टपूर्तता झाली असल्याचे बैठकीत सांगितले. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रासाठी वाटप झालेल्या बँक निहाय कर्जाची माहिती दिली.  

  यावेळी संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक बैठकीस उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post