प्रेस मीडिया लाईव्ह :
सौ. सविता पाटील :
कोल्हापूर : प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या गणेशमूर्ती पर्यावरणाला धोकादायक आहेत. त्यामुळे पाणीप्रदूषण तर होतेच.शिवाय हेच पाणी पिल्याने नागरीकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. सण - उत्सव माणसाच्या आनंदासाठी आहेत. हा आनंद साजरा करताना स्वतः चे आणि इतरांचेही आरोग्य धोक्यात येऊ नये. पर्यावरणाचा समतोल बिघडू नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.
दरवर्षी गणेशमूर्तींचे सार्वजनिक पाण्याच्या स्त्रोतामध्ये विसर्जन केल्याने नदीपात्रात खोली कमी होऊन पात्राचा उथळपणा वाढत आहे. विहिरींची खोली कमी होऊन गाळाचे प्रमाण वाढत आहे. पर्यायाने पाणीसाठा कमी होत आहे. सजावटीसाठी वापरलेले साहित्यही यासोबतच पाण्यात टाकले जाते. गणेशोत्सवाचा हेतूच लक्षात घेऊन गणेश उत्सव साजरा करावा. सर्वांनी एकत्र यावे. हे संस्कार बालमनावर करणे गरजेचे आहे हे ओळखून उपक्रमशील शिक्षिका सौ. सविता चंद्रकांत पाटील यांनी आपल्या विद्यार्थ्यांना स्वतः आपल्या शेतातील मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पारंपरिक प्लॅस्टर ऑफ पॅरिस च्या मूर्तीला फाटा देत स्वतः मातीच्या गणेशमूर्ती बनवून घरच्यांचीही सहमती मिळवली आणि घरी विधीवत गणेशपूजन केले. विद्यार्थ्यांना स्वनिर्मितीचा आनंदही मिळाला. विद्यार्थ्यांवर हा संस्कार होण्यासाठी सविता पाटील यांनी स्वतःचं उदाहरण विद्यार्थ्यांसमोर ठेवले. त्या स्वतः गेली दहा वर्षे स्वतः च्या शेतातील मातीपासून गणेशमूर्ती बनवतात आणि मनोभावे पूजन करतात. त्यामुळे कृतीतून केलेला संस्कार बालमनावर खोलवर रुजला. या उपक्रमात राजवीर खोत, दिया पाटील, समिक्षा चौगुले, तनुजा चौगुले, संजना माने, वेदांत कांबळे, अनुष्का पाटील, श्रेयाली घोडके, संस्कृती चौगुले, मुग्धा मोरे या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मुख्याध्यापक एस. डी. खोत सर यांचे मार्गदर्शन लाभले तर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कर्नल एम. व्ही वेस्वीकर, मा. चंद्रशेखर कुलकर्णी यांचे प्रोत्साहन मिळाले. संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत मा. समरजितसिंह घाटगे यांची प्रेरणा मिळाली.