प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहेत . अनेक ठिकाणी खूनाच्या घटना उघडकीस येत आहेत. आता कोल्हापुरातही एक धक्कादायक घटना समोर आली आहे.तंबाखू खिशात असतानाही नाही म्हणून सांगितलं. म्हणून खोटं बोलल्याच्या रागातून दोघांनी एकाचा खून केला आहे. लाकडी बांबूने व दगडाने ठेचून हा निर्घृण खून करण्यात आला.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शंकर आकाराम कांबळे (वय-55, रा. माळापुडे, ता. शाहुवाडी) असे मृताचे नाव आहे. ही धक्कादायक घटना आज सोमवारी पहाटेच्या सुमारास शिवाजी उद्यमनगर परिसरात कोटीतीर्थ तलावाजवळ घडली.
घरगुती गणेश विसर्जनासाठी नागरिक आज सकाळी घराबाहेर पडत असतानाच सकाळच्या सुमारास रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. आठ दिवसांपूर्वी शंकर कांबळे हे कोल्हापुरात आपल्या मुलीकडे आले होते. ते सोमवारी पहाटे कोटीतीर्थ परिसरात फिरत होते.याच दरम्यान, कांबळे यांच्याकडे शुभम शेंडगे आणि रोहित सूर्यगंध या संशयितांनी तंबाखू मागितली. यावर कांबळे यांनी तंबाखू नसल्याचे सांगितले. मात्र, यानंतर संशयित दोघांनी कांबळे यांना पकडले आणि त्यांची अंगझडती घेतली. तर यावेळी कांबळे यांच्या खिशात तंबाखू आढळून आले.
यानंतर खोटे बोलल्याच्या रागातून दोघांनी त्यांना बेदम मारहाण केली. तसेच शेजारील दगड व लाकडी बांबू डोक्यात घालून ठेचले. यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना तेथेच घटनास्थळावरुन पोबारा केला. यात अतिरक्तस्त्रावामुळे कांबळे यांचा मृत्यू झाला.