प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : गांजा विक्री करणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. पथकाने सापळा रचून कारवाई करताना 37 हजार 400 रुपये किंमतीचा 1 किलो 870 ग्रॅम गांजासह, मोपेड आणि रोख रक्कम साडे तीन हजार रुपये असा 57 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राहुल तानाजी कांबळे (वय 30, रा. पाचंगाव महादेव तालीम मागे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस अमंलदार महेश गवळी यांना करवीर पोलीस ठाणे हद्दीमध्ये बाबा जरग नगर कमानी जवळील पहिल्या बस स्टॉप शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात गांजा विक्रीसाठी वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचत संशयित आरोपी राहुलला पकडले.
या प्रकरणात पोलीस अंमलदार महेश गवळी यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरज बनसोडे करत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवड,अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, संजय गोर्ले, पीएसआय विनायक सपाटे व शेष मोरे, पोलीस अमंलदार महेश गवळी, खंडेराव कोळी, विजय गुरखे, रविंद्र कांबळे, सुरज चव्हाण, अनिल जाधव, महादेव कुराडे, पांडूरंग पाटील, नामदेव यादव यांनी केली