प्रेस मीडिया लाईव्ह :
लिओ टॉलस्टॉय
----–-----
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )
Prasad.kulkarni65@gmail.com
नऊ सप्टेंबर हा सार्वकालिक महान साहित्यिक लिओ टॉलस्टॉय यांचा जन्मदिन. विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या या जगप्रसिद्ध रशियन साहित्यिकाच्या साहित्याने गेले दीड शतक जगावर मोहिनी घातलेली आहे.राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पासून रोमा रोलापर्यंत सर्वांना प्रभावित करणारे ते एक असामान्य प्रतिभावंत होते. त्यांचा जन्म ९ सप्टेंबर १८२८ रोजी झाला आणि २० नोव्हेंबर १९१० रोजी ते कालवश झाले. टॉलस्टॉय यांच्या ' वॉर अँड पीस ' आणि ' अँना कॅरेनिना ' या कादंबऱ्या जगभरात गाजल्या.त्यांनी विपुल लेखन केले. त्याद्वारे मानवतेचा मोठा संदेश जगाला दिला. आज जगामध्ये जी अस्वस्थता, हिंसा,अस्थैर्य पसरलेले आहे त्या पार्श्वभूमीवर टॉलस्टॉय यांच्यासारख्या तत्त्वचिंतक साहित्यिकांची आठवण वारंवार येत राहते. मानवी जीवन पूर्णतः उध्वस्त करून टाकणाऱ्या युद्धाने प्रश्न सुटत नाहीत, उलट ते अधिक बिकट होतात.म्हणूनच शांतता आणि प्रेमाच्या आधारे संघर्ष मिटवले पाहिजेत असा संदेश त्यांनी ' वॉर अँड पीस ' या कादंबरीतून दिलेला आहे. आज जग अर्थकारणापासून धर्मकारणापर्यंत सर्वत्र हिंसेचे थैमान पाहते आहे.अशा वेळी प्रेम आणि शांतता याचे महत्व सांगणाऱ्या टॉलस्टॉय यांच्या विचारांची मोठी गरज आहे.‘सारी सुखी कुटुंबं एकसारखी असतात, प्रत्येक दुःखी कुटुंबाची कथा मात्र निराळी त्यांच्या दृष्टीने असते.’लिओ टॉल्स्टॉय यांच्या अॅना कारेनिना या कादंबरीतील ही पहिलीच ओळ त्यांच्या दुःखमुक्तीच्या विचारांचा परिचय देते.
टॉलस्टॉय यांच्या काळामध्ये रशियातील स्थिती फारच भयानक होती. मुठभर श्रीमंत आणि प्रचंड मोठ्या संख्येने दारिद्र्यात खितपत पडणारी जनता असा तो काळ होता. पण सत्तेवर असलेल्या झारला ही विषमता दिसत नव्हती.दिसत असेल तरी ते मानत नव्हते.कारण झार हा सरंजामदार, भांडवलदार, अमीर उमराव यांचाच प्रतिनिधी होता. त्यामुळे आपल्या सत्तेला कोणी विरोध केला की त्याची धरपकड करणे ,हद्दपार करणे, फाशी देणे आदी प्रकार झार करत होता. आजच्या काळात आपल्याकडे सत्तेविरूद्ध बोलणाऱ्याला, प्रश्न उपस्थित करणाऱ्याला जसे देशद्रोही ठरवले जाते किंवा ईडी लावली जाते किंवा ते टाळायचे असेल तर पक्षात पावन करून घेतले जाते तसाच तो प्रकार होता.फक्त झारची राजवट हुकूमशही होती आपल्याकडे लोकशाहीची शपथ घेऊन सुरू आहे हा फरक आहे.
टॉलस्टॉय महान साहित्यिक तर होतेच पण त्याचबरोबर ते श्रमाचे उपासक, प्रयोगशील शिक्षणतज्ञ, शांततेचा संदेश देणारे ऋषी ,तत्ववेत्ते,कठोर आत्मटीकाकार ,दांभिकतेवर तुटून पडणारे सामर्थ्यवान व्यक्तिमत्व होते. एका गर्भश्रीमंत घरात त्यांचा जन्म झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर चार हजार एकर शेती,४२ खोल्यांचे प्रचंड घर आणि ३३० गुलाम त्यांच्या वाटणीला आले.मानवतेच्या या उपासकाने गुलामांच्या मुक्ततेचा प्रयत्न केला. पण गुलामांचीच मानसिक तयारी होत नव्हती. म्हणून त्यांनी त्यांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांसाठी , भूदासांसाठी शाळा सुरू केल्या .हसत खेळत सहशिक्षणाचे तत्त्व रुजवले.सोपी, आकर्षक, चित्रमय पाठ्यपुस्तके बनवली. सोप्या,आशयघन कथा लिहिल्या.
टॉलस्टॉय यांनी कॉकेशस आणि क्रिमियातील युद्धाचे दाहक अनुभव घेतलेले होते. युद्धातील क्रूरता आणि अत्याचार पाहून त्यातील अर्थहीनता त्यांना दिसली. परिणामी शांतता आणि विश्वबंधुत्वाची संकल्पना महत्वाची वाटू लागली. त्यांच्या लेखनातून या गोष्टी पुढे येऊ लागल्या. धर्माच्या नावावर पाळल्या जाणाऱ्या भोंदूगिरीवर आणि कर्मकांडावर ही हल्ला त्यांनी केला. कथा, कादंबऱ्या, प्रचंड वैचारिक लेख यातून त्यांनी शांतता आणि धर्मांधता विरोध प्रभावीपणे मांडला. परिणामी राजसत्ता व धर्मसत्तेने त्यांना बहिष्कृत केले. रशियातील झारचे गुप्त पोलीस छळू लागले. मात्र दुसरीकडे त्यांच्या लेखनाने जगभरच्या सामाजिक, राजकीय,वैचारिक चळवळींना पाठबळ मिळाले.अनेक नेते मंडळी, साहित्यिक, विचारवंत त्यांच्याकडे आकर्षित झाले. रशियाचा महान साहित्यिक दोस्टोव्हसकीने म्हटले होते की, 'आपल्यापैकी कोणत्याही लेखकाची टॉलस्टॉयशी तुलना होऊ शकणार नाही.'
अमाप संपत्ती आणि भौतिक सुख पायाशी लोळण घेत असूनही अतिशय साधेपणाने ते राहत असत.शेतकऱ्यांच्या पोशाखात राहणे, स्वतःची सर्व कामे स्वतः करणे, शेतात राबणे, गरिबांना मदत करणे ,सर्वांशी प्रेमाने वागणे ही त्यांची जीवनशैली होती. कुटुंबातील इतरांचा व्यवहारवाद आणि यांचा आदर्शवाद यातून कौटुंबिक संघर्ष उभा राहिला. त्यातूनच वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. पण अल्पावधीतच त्यांचे निधन झाले. गांधीजींवर त्यांचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या पंचशील तत्त्वांवर ,शांततापूर्ण सहअस्तित्वाच्या तत्त्वावरही त्यांचा प्रभाव आहे. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी टॉलस्टॉय बसवलेलं होतं. त्या दोघांची भेट केवळ पत्र व्यवहाराद्वारे झालेली होती.तरीही गांधीजींवर त्यांचा मोठा प्रभाव होता. टागोरांवरही टॉलस्टॉय यांचा प्रभाव दिसून येतो.लेनिन यांनीही टॉलस्टॉय यांचे महानपण आणि ऋण मान्य केले.रोमारोलांनी 'अखिल विश्वाची सद्सद्विवक बुद्धी 'असे त्यांचे वर्णन केले होते.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे गेली ३७ वर्षे कार्यकर्ते आहेत तसेच गेली ३३ वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)