तुम्हाला ठाऊक असेलच की फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉटसअप यांची मेटा (Meta) ही मुळ कंपनी आहे. याच मेटामध्ये एक नवा विभाग सुरु करण्यात आला आहे. हा नवा विभाग पेड फीचरवर काम करत असल्याच्या बातम्या आहेत. म्हणजेच भविष्यात तुम्हाला हे फीचर्स वापरण्यासाठी पैसे भरावे लागणार असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. महत्त्वाची बाब म्हणजे या विभागाच्या प्रमुख प्रतीती रॉय या असणार आहेत. प्रतीती रॉय यांनी याआधी मेटामध्ये हेड ऑफ रिसर्च म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. एका आंतरराष्ट्रीय टेक वेबसाईटच्या माहितीनुसार फेसबुक, इंस्टाग्राम मेटाने एक स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. या विभागाचं नाव न्यू मॉनेटायझेशन एक्सपीरियन्स असं आहे. या विभागात आणि व्हॉटसअप या वरील पेड फीचर्सवर काम करण्यात येणार आहे.
इतर कंपन्याही देतात पेड फीचर्स
ट्विटर, स्नॅपचॅट आणि मेटा या कंपन्यांच्या उत्पन्नाचा सर्वाधिक हिस्सा हा जाहिरातींमधून येतो. मात्र या नव्या विभागाच्या मदतीने कंपनीला जहिरातींशिवायही पैसे कमावण्याचं साधन मिळणार आहे. स्नॅपचॅट आणि ट्विटर या कंपन्यांनी या आधीच पेड फिचर द्यायला सुरुवात केली आहे.