लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
अमरावती मधील एक तरुणी 'लव जिहाद' प्रकरणात बेपत्ता झाल्याचा आरोप केला जात होता. मात्र बेपत्ता झालेली ही 19 वर्षीय तरुणी रागाच्या भरात स्वतःच घर सोडून गेल्याचे स्पष्ट झाले आहे.यामुळे 'लव्ह जिहाद'ची बोगस थिअरी रचत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन राडा घालणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा तोंडघशी पडल्या आहेत . बेपत्ता तरुणीने दिलेल्या साक्षीमुळे या प्रकरणात लव्ह जिहादवरून राळ उठविणाऱ्या भाजप नेते सुद्धा तोंडघशी पडले आहे
अमरावतीमधील तरुणीला फूस लावून पळवून नेण्यात आले असून हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. हिंदू तरुणींशी लग्न करून त्यांचे धर्मांतर केले जाते तसेच त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले जातात; मात्र पोलीस काहीच कारवाई करत नाहीत. या प्रकरणात कारवाई करण्यास सांगितल्याने पोलिसांनी आपला फोन कॉल रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन राडा घातला होता. अमरावतीतून बेपत्ता झालेली ही तरुणी साताऱ्यात रेल्वे स्टेशनवर सापडली आहे. अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
बेपत्ता झालेली तरुणी पुण्यात होती आणि ती पुण्यातून ट्रेनने साताऱ्याकडे जात आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. साताऱयात ती मुलगी ट्रेनमधून उतरली तेव्हा सातारा पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन अमरावती पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ती एकटीच होती. तिच्यासोबत कुणीही नव्हते, अशी माहिती अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी दिली आहे.
सातारा पोलिसांनी तिचा प्राथमिक जबाब नोंदवला आहे. त्यात तिने एवढेच सांगितले की, मी स्वत: रागाच्या भरात घरातून निघून गेले होते! ती तरुणी अमरावतीत आल्यावर तिचा तपशीलवार जबाब नोंदविण्यात येईल, असे आरती सिंग यांनी सांगितले.