प्रेस मीडिया लाईव्ह
सुनील पाटील
टोल वसुलीसाठी सरकार नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. जर याची अंमलबजावणी झाली, तर FASTag तंत्रज्ञानाचीही गरज पडणार नाही. केंद्र सरकार जीपीएस सॅटेलाइट तंत्रज्ञानाच्या मदतीनं टोल टॅक्स वसूल करण्याच्या तयारीत आहे.
सध्या हे सर्व काम वाहनाच्या काचेवर लावलेल्या FASTag द्वारे केलं जातं. FASTag रिचार्ज करणं आवश्यक आहे आणि वाहन टोल प्लाझातून जाताच, प्लाझावरील RFID वाचक FASTag मधून पैसे कापतात. यामध्ये चालकाला काही करण्याची गरज नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅटेलाइट आधारित टोल वसुली सिस्टमची तपासणी सध्या पायलट प्रोजेक्टमध्ये सुरू आहे.
नव्या तंत्रज्ञानामध्ये जीपीएस सॅटेलाइट तंत्रज्ञानाच्या आधारे टोल टॅक्स वसूल केला जाणार आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे तुम्ही जितकं अंतर कापता तितकाच टोल टॅक्स तुमच्याकडून आकारला जाईल. महामार्गावरील अंतरासाठी टोल घेतला जाईल. या वर्षी मार्चमध्ये रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितले होतं की सरकार पुढील एका वर्षात देशभरातील सर्व टोल प्लाझा बूथ हटवेल. या दिशेनं काम वेगानं सुरू आहे.
सरकारचं म्हणणं काय ?
टोल बुथच्या जागी जीपीएस आधारित टोल वसुली यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची माहितीही नितीन गडकरी यांनी दिली. जीपीएस इमेजिंगच्या मदतीनं महामार्ग किंवा एक्स्प्रेस वेवर चालणाऱ्या वाहनांकडून टोल टॅक्स वसूल केला जाईल. जीपीएस आधारित टोल टॅक्स वसुलीचे तंत्रज्ञान सध्या अनेक युरोपीय देशांमध्ये आधीच लागू करण्यात आलं आहे आणि त्यास मिळालेलं यश पाहता भारतातही लागू केली जाणार आहे. सध्याच्या नियमात टोल टॅक्सच्या मोजणीसाठी महामार्गाचे अंतर म्हणजेच एका पट्ट्याचे अंतर ग्राह्य धरलं जाते. हे सहसा ६० किमी असतं आणि जर ते कमी किंवा जास्त असेल तर त्यानुसार कर देखील बदलला जातो. परंतु ६० किमी मानक मानलं जातं. त्याच रस्त्यावर एखादा पूल, कल्व्हर्ट किंवा ओव्हरब्रिज पडला तर त्याचा टोल बदलतो.
नव्या तंत्रज्ञानात काय ?
नवीन तंत्रज्ञानामध्ये तुमची कार किती अंतर कापेल या आधारावर टोलचे पैसे कापले जातील. त्यासाठी दोन तंत्रज्ञानावर काम सुरू आहे. पहिल्या तंत्रज्ञानामध्ये, वाहनात जीपीएस ट्रॅकिंग तंत्रज्ञान असेल, ज्यामुळे महामार्गावरील सॅटेलाइटद्वारे वाहन मालकाच्या बँक खात्यातून थेट टोलचे पैसे कापले जातील. दुसरं तंत्र म्हणजे नंबर प्लेटद्वारे टोल वसुली.
नंबर प्लेटवर टोलसाठी संगणकीकृत प्रणाली असेल जी सॉफ्टवेअरच्या मदतीने टोल वसूल करण्यास मदत करेल. या तंत्रात महामार्गावर वाहन कोणत्या पॉइंटवरून प्रवेश करेल, त्याची माहिती नोंदवली जाईल. यानंतर महामार्गावरून गाडी ज्या पॉईंटवर जाईल, तेथेही त्याची नोंदणी केली जाईल. या दरम्यान, महामार्गावर वाहन किती किलोमीटर चालले असेल त्यानुसार वाहन मालकाच्या बँक खात्यातून टोलचे पैसे कापले जातील.