प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )
Prasad.kulkarni65@gmail.com
काही वर्षांपूर्वी पंचगंगा नदीच्या प्रदूषणामुळे इचलकरंजीत चाळीसावर नागरिकांचा कावीळीमुळे बळी गेला होता. दहा हजारांवर लोक कावीळग्रस्त झालेले होते. अर्थात त्या आधीपासूनही पंचगंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न अतिशय गंभीर बनलेला होता व आहेही. आपल्या गावातून नदी वाहते पण आपण तिचे पाणी पिऊ शकत नाही हे भयाण वास्तव आहे.पंचगंगेचे पाणी शेती व जलचरांसाठीही जीवघेणे ठरत आहे.हे वास्तव स्वीकारून आपण नदीचे प्रदूषण रोखण्याची सामूहिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे.तशी भूमिका अनेक जण मांडतात.त्यासाठी प्रयत्न केले जातात. मोहीमा आखल्या जातात. ही चांगली व सकारात्मक बाब आहे.
मात्र आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीचे विद्यमान आमदार मा.प्रकाशअण्णा आवाडे यांनी गणेश मूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीमध्ये केले जावे अशी जाहीर भूमिका घेऊन शासन - प्रशासन स्तरावर तसे प्रयत्न केले. त्याला माननीय उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता देऊन कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश दिल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे.त्याचा गांभीर्याने पुनर्विचार केला जाण्याची गरज आहे.त्यात व्यापक भूमिका घेत आमदारांनीच पुढाकार घ्यावा ही अपेक्षा आहे.
कोणतीही परंपरा वर्तमानाचा व भविष्याचा विचार करून समाजाला पुढे घेऊन जाणारी असावी हे गृहीत तत्त्व आहे. सामाजिक जीवन पद्धतीला उपयुक्त व इष्ट ठरलेले आणि संमत होत गेलेल्या आचार विचारांची अलिखित प्रथा म्हणजे परंपरा असे मानले जाते. मात्र ही परंपरा जीवनाभिमुख असावी हे ही मान्य केले गेले आहे.खरा परंपरावाद हा आदर्श दृष्टिकोन बाळगणारा आणि वर्तमान परिस्थितीशी मिळते जुळते घेणारा असतो. त्यामुळे नदीतच विसर्जन केले तरच परंपरेचे पालन होते असे मानणे योग्य नाही. तसेच नदीत विसर्जन न केल्याने नदीचे संपूर्ण प्रदूषण थांबणार आहे असे नाहीच.पण त्यामुळे प्रदूषण वाढीला मदत होणार नाही हेही तितकेच खरे आहे.विचारांचे व भावनांचे तकलुपीकरण व विद्रूपीकरण हे नेहमीच नैसर्गिक व वैचारिक प्रदूषणत भर घालत असते.
खरे तर गेली आठ वर्षे प्रदूषणामुळे पंचगंगेत गणेशमूर्तींचे विसर्जन न करण्याची मोहीम यशस्वी ठरत आलेली आहे. गेली दोन-तीन वर्षे तर शहापूरच्या खाणीमध्ये शंभर टक्के गणेश मूर्तींचे विसर्जन होत आहे.त्यामुळे हा प्रश्न पुन्हा चर्चेत आणणे अतिशय चुकीचे आहे. गणपती ही बुद्धीची देवता आहे असे मानले जाते.त्यामुळे सर्व भक्तांनीही किमान विवेकी विचार करावा ही अपेक्षा आहे. सण, उत्सव, समारंभ हे मांगल्याचे प्रतीक म्हणून आपण साजरे करत असतो. ते उत्साही व निरोगी वातावरणात साजरी झाले पाहिजेत याकडे सर्वांनीच गांभीर्याने आणि काटेकोरपणाने लक्ष दिले पाहिजे.
भारतीय संविधानाने नागरिकांची मूलभूत कर्तव्य सांगितलेली आहेत. कलम ५१( क) मध्ये असलेल्या या कर्तव्ययादीत सातवे कर्तव्य ,'अरण्ये,सरोवरे, नद्या व वन्य जीवसृष्टी आदी नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धि बाळगणे ' हे कर्तव्य सांगितलेले आहे. अर्थात ही कर्तव्ये अंमलबजावणीसाठी ठेवलेली आहेत. ती सक्तीची नसली तरी त्याचे पालन स्वेच्छेने व्हावे ही अपेक्षा आहे. पण आपल्या सामाजिक कर्तव्याप्रतिच गंभीर नसणे हे योग्य नाही. पंचगंगेच्या प्रदूषणाच्या प्रश्नावर काही वर्षांपूर्वी जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंह राणा यांचे इचलकरंजी नगरपालिकेच्या वतीने जाहीर व्याख्यान ठेवले होते. समाजवादी प्रबोधिनी व नदीघाटावरही सामाजिक कार्यकर्त्यांशी ,पर्यवरण स्नेही नागरिकांशी त्यांनी खुली चर्चा केली होता. त्यावेळी त्यांनी पंचगंगेला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी अनेक उपाय योजना सुचवलेल्या होत्या.'इचलकरंजीचा नदीघाट अतिशय सुंदर आहे पण त्यातील पाणी मृत आहे 'हे त्यांचे त्यावेळचे विधान आपण आजही गंभीरपणे घेतो की नाही हा मुद्दा आहे.
नद्यांचे प्रदूषण हा राष्ट्रीय विषय आहे. पंचगंगेचे प्रदूषण हा तर आपणा पंचगंगेच्या काठावरच्या सर्वांचाच अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्याबाबतचे आपले सामाजिक उत्तरदायित्व आपण जपले पाहिजे.याचे भान या मोहिमेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.शासन-प्रशासन आणि समाज यांनी एकत्र येऊन प्रामाणिक प्रयत्न केले सर सर्वांगीण प्रदूषणाचा प्रश्न सुटू शकतो.ती इच्छाशक्ती निर्माण करण्यासाठीच्या लोक जागरणाचे काम केले पाहिजे.त्याला सहकार्य करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. पंचगंगेच्या प्रदूषणाची काळरात्र नष्ट होऊन संपन्न पर्यावरणाची सकाळ लवकर उगवावी यासाठी मोहीम आखुया, सहकार्य करूया. हा प्रश्न भावनिक अथवा राजकीय संकुचित भूमिकेतून न बघता व्यापक सामाजिक भानाचा म्हणून आपण लक्षात घेण्याची गरज आहे. आपण सर्व नागरिकांनीही भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपण आपली नदी पुन्हा पुन्हा प्रदूषित करणार का ? पाणी अधिकाधिक विषारी करणार का ?याचा विचार केलाच पाहिजे.आपण सर्वजण विसर्जन विवेकाने करू, विवेकाचे नको.
--------------------------------
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे 'सरचिटणीस' आहेत.आणि प्रबोधिनीच्या वतीने गेली तेहत्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)