जी.डी.बापू लाड यांचे प्रतिसरकारमधील योगदान आजही प्रेरणादायी आहे ..-------प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन



प्रेस मीडिया लाईव्ह :

सातारा ता. १०,भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात साताऱ्याचे प्रतिसरकार हे एक तेजस्वी पर्व आहे.  ब्रिटिश साम्राज्यशाही प्रमाणेच एतद्देशीय गुन्हेगारी, दरोडेखोरी ,सावकारी, विघातक विकृती विरुद्ध लढण्यासाठी साताऱ्यात प्रतिसरकारची स्थापना झाली. त्या प्रतिसरकार मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीअग्रणी जी.डी बापू लाड यांनी अतिशय मोलाची भूमिका बजावल. मध्यवर्ती युद्धमंडळ, न्यायदान मंडळ, लष्करी प्रशिक्षण केंद्र, जनता कोर्ट, तुफान दल,आघात दल, चवळीसाठी निधी उभारण्यासाठी खजिना लूट, दारूबंदी ते अस्पृश्यता निर्मूलन अशा अनेक माध्यमातून जी.डी.बापूंनी  जे काम केलं ते आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही अतिशय महत्त्वाचे आहे,असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज ( स्वायत्त) च्या वतीने आयोजित व्याख्यानात " सातारा प्रतिसरकार मधील क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी. बापू लाड यांचे कार्य "या विषयावर बोलत होते. 



अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार वावरे होते. आमदार अरूणअण्णा लाड यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, छत्रपती शिवाजी कॉलेजचा अमृतमहोत्सव आणि क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड जन्मशताब्दी या निमित्ताने हे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. स्वागत व प्रस्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर धनंजय मासाळ यांनी केले पाहुण्यांचा परिचय प्रा. मनोहर निकम यांनी करून दिला. यावेळी  मंचावर भाई व्ही.वाय.पाटील,उपप्राचार्य डॉ. रामराजे माने देशमुख, माजी प्राचार्य डॉ.आर.डी. गायकवाड, प्रा. भास्कर कदम यांची मंचावर उपस्थिती होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले, अतिशय संघर्षशाली जीवन क्रांतीअग्रणी बापू जगले.एक धगधगता इतिहास त्यानी निर्माण केला.क्रांतीच्या मशालीने साम्राज्यवादी अंधार दूर करण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत अग्रणीपणे ते करत राहिले.देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात प्राणाची पर्वा न करता सहभागी झालेल्या बापूंची 'महाराष्ट्राचे  शिल्पकार ' या मालिकेतही आदराने नोंद घेतली जाते. सर्वसामान्य जनतेसाठी सरकारने कशी धोरणे राबवली पाहिजेत याचे उदाहरण स्वातंत्र्यपूर्व काळात प्रतिसरकारच्या माध्यमातून ,स्वातंत्र्य आंदोलनातून आणि स्वातंत्र्योत्तर काळात,शेती,पाणी,शिक्षण,सहकार, कष्टकरी, कामगार क्षेत्रासह विविध क्षेत्रातील अफाट कार्यकर्तृत्वातून बापूंनी दाखवून दिले. आपल्या दीड तासाच्या ओघवत्या शैलीतील भाषणात प्रसाद कुलकर्णी यांनी स्वातंत्र्य आंदोलन, प्रतिसरकार ,क्रांतीअग्रणी डॉ.जी. डी. बापूंचे कार्य आणि  वर्तमान काळात त्याचे महत्त्व याची सवित्तर व  सखोल  मांडणी केली.

आमदार अरुणअण्णा लाड म्हणाले ,प्रतिसरकारच्या काळामध्ये क्रांतीअग्रणी जी.डी. बापू लाड यांनी वयाच्या वीस ते पंचवीशीत जे काम केले ते अतिशय प्रेरणादायी स्वरूपाचे होते.तन-मन धन अर्पण करत प्रतिसरकार आणि ब्रिटिश साम्राज्यशाही विरोधी लढा प्राणाची पर्वा न करता ते आपल्या सहकाऱ्यांसहित कार्यरत राहिले.अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची ती उर्मी आजच्या तरुणांनाही अंगीकारण्याची गरज आहे.

अध्यक्षस्थानावरून बोलताना उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार वावरे म्हणाले, साताऱ्याचे प्रतिसरकार आणि त्यातील क्रांतीअग्रणी बापूंचे योगदान जाणून घेणे म्हणजे एका अर्थाने मूल्यवर्धन आहे. समाजवादी समाजरचनेची कास धरून आणि सर्वांगीण समतेची आस धरून प्रतिसरकार आणि ब्रिटिश विरोधी लढा लढला गेला. आज त्याचा आशय जपणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण त्या मूल्यांपासून आपण दूर जात आहोत. अशावेळी ती मूल्ये समजून घेणे, स्वीकारणे व रुजवणे फार महत्त्वाचे आहे. महाविद्यालयाच्या बॅरिस्टर पी.जी. पाटील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. विकास यलमार यांनी आभार मानले.प्रा. माधवी गोडसे यांनी सूत्रसंचालन केले.

Post a Comment

Previous Post Next Post