संजय राठोड यांचा चित्रा वाघ यांना इशारा !
प्रेस मीडिया लाईव्ह :
सुनील पाटील :
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल ३९ दिवसांनी काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे.
यामध्ये पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप असलेले संजय राठोड यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली. संजय राठोड ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री होते. त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आंदोलने केली होती. चित्रा वाघ त्यात अग्रेसर होत्या. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी त्यांना पुन्हा मंत्रिपद दिल्यामुळे मोठी टीका होत आहे. यावर आज मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर संजय राठोड यांनी स्पष्टीकरण दिले आहे. संजय राठोड म्हणाले, "मी मोठ्या मताने ४ वेळा विधानसभेवर निवडून आलो आहे. मला मंत्रिपदाची संधी मिळाली मागच्या सरकारमध्ये देखील मी मंत्री होतो. त्यावेळी एक घटना दुर्दैवी झाली त्यावरुन माझ्यावर आरोप झाले. ते आरोप झाल्यानंतर नैतिक जबाबदारी समजून आरोपाची निस्पक्ष चौकशीसाठी मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर मला या प्रकरणामध्ये क्लिन चीट दिली आहे. तसा अहवाल देखील पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे. ते कागदपत्र बघून मला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मंत्रिपदाची संधी दिली."
कायदेशीर कारवाई करेल - संजय राठोड
भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपावर संजय राठोड म्हणाले, "लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार असतो. पण कोणी काय बोलावे याला मर्यादा असतात. मी निर्दोष असल्याचे कागदपत्रे चित्रा वाघ यांना पाठवण्याती सोय करतो. मी आतापर्यंत शांत होतो. पण यापुढे असे आरोप झाल्यास मी कायदेशीर कारवाई करेल"
काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ..?
भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या, "पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे."
काय आहे प्रकरण..?
बीड जिल्ह्यातील टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने ७ फेब्रुवारी २०२१ रोजी पुणे येथे एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारून आपली जीव दिला होता. या गूढ मृत्यू प्रकरणाला राजकीय वळण लागले होते. ठाकरे सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांचे नाव या प्रकरणात उघड झाले होते. संजय राठोड व पूजा चव्हाण या तरुणीचे संबंध असल्याचे काही फोटो व व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर देखील संजय राठोड यांनीच पूजा चव्हाणला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा सूर उमटला होता. या प्रकरणानंतर संजय राठोड नॉट रीचेबल होते.
संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता-
या प्रकरणात संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. हा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिले होते. हे पत्र उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत वाचून दाखवण्यात आले होते. :