प्रेस मीडिया लाईव्ह
सुनील पाटील :
बिअर शॉप समोरच बिअरचे सेवन करणाऱ्या मद्यपींमुळे परिसर अस्वच्छ होत असून नागरिकांना नाहक त्रास होत असल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून नागरिकांच्या हिताकडे शासनाचे लक्ष वेधले.
पनवेल तालुक्यातील कळंबोली, कामोठे येथे परवानग्या देण्यात आलेल्या बियर शॉप समोरच बिअरचे सेवन करणाऱ्या मद्यपि मुळे परिसर अस्वच्छ होत असून नागरिकांना नाहक त्रास होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर बिअर शॉप समोर बियर सेवन करणारे मद्यपी बियरच्या बाटल्या त्याच ठिकाणी फेकत असल्याने बाटल्यांच्या काचांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असून महिला वर्गामध्ये या मद्यपींमुळे भितीचे वातावरण निर्माण होत आहे. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बियर शॉपीसमोर उघड्यावर बिअर पिणाऱ्या मद्यपिंवर कोणतीही कारवाई होत नाही, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करुन उघडयावर बिअर पिण्यास परवानगी देणाऱ्या बिअर शॉप मालकांवर तसेच दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दाखल केला होता.
राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी या प्रश्नावर लेखी स्वरूपात दिलेल्या उत्तरात सांगितले कि, पनवेल तालुक्यातील कळंबोली, कामोठे बिअर शॉप समोरच बियरचे सेवन करणाऱ्या मद्यपि मुळे परिसर अस्वच्छ होत असून नागरिकांना नाहक त्रास होत असल्याचे निदर्शनास आल्याची बाब अंशतः खरी आहे. कळंबोली, कामोठे कार्यक्षेत्रातील एकूण ७ एफएल / बीआर- २ अनुज्ञप्तीच्या परिसरामध्ये ग्राहक मद्यसेवन करीत असल्याचे आढळून आले आहे. बीअर शॉपीसमोर उघड्यावर बीअर पिणारे मद्यपी आढळून आल्यास त्यांचेवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ नुसार कारवाई करण्याबाबत अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रायगड यांनी संबंधित कार्यक्षेत्रिय अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. एप्रिल, २०२२ ते जून २०२२ या कालवधीमध्ये पनवेल (जि. रायगड) तालुक्यातील कळंबोली, कामोठे कार्यक्षेत्रातील एकूण ७ एफएल / बीआर- २ अनुज्ञप्तीविरुध्द विभागीय विसंगती गुन्हे नोंद करण्यात आले असून महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ अंतर्गत तरतुदीनुसार त्यांचेवर दंडात्मक कारवाई सुरु आहे.