रिक्षाला सीएनजीसाठी अनुदान द्या - बाबा कांबळे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : केंद्र सरकार, राज्य सरकार व महापालिका अनेकांना अनुदान देते. मात्र रिक्षा चालकांकडे दुर्लक्ष होत आहे. एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के लोकांना रिक्षा चालक सेवा देत आहेत. आम्ही प्रवासी सेवा देतो, परंतु आम्हाला मात्र कोणते अनुदान दिले जात नाही. त्यामुळे आता सीएनजी वरती महानगरपालिका, केंद्र व राज्य सरकारने अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली.
सीएनजी मध्ये झालेल्या दर वाढ व इतर प्रश्नांसाठी रिक्षा चालकांचे पुणे आरटीओ समोरील पेट्रोल पंपावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या वेळी मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक, मालक उपस्थित होते. या वेळी बाबा कांबळे बोलत होते.
या वेळी पुणे शहराध्यक्ष शफिक भाई पटेल, उपाध्यक्ष अरशद अन्सारी, मुराद काजी, मोहम्मद शेख, किरण एरंडे, अविनाश वाडेकर, सलीम सय्यद, यादव, संजय गुजलेकर, साजीद पठाण, आयाज शेख, संजय शिंदे, अहमद शेख, अकबर शेख, शाहरुख सय्यद, अमित ठाकूर, लक्ष्मण शेलार, संजय दौंडकर, रवींद्र लंके पदाधिकारी व शेकडो रिक्षाचालक सहभागी होते. महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे लोणावळा शहर अध्यक्ष बाबू भाई शेख, प्रदेश संघटक हाजी अब्बास खान,सुहास कदम, विल्सन मस्के,उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या सदर सीएनजी दरवाढ विरोधी आंदोलनास आम आदमी रिक्षा संघटना, शिवनेरी रिक्षा संघटना, रिक्षा चालक मालक कृती समिती या संघटनेतर्फे पाठिंबा देण्यात आला.
बाबा कांबळे म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी सीएनजीचा दर हा 62 रुपये होता. तीन महिन्यांमध्ये अंदाजे 50 टक्के हा दर वाढून आजच्या तारखेस प्रति किलो 91 रुपये असा झालेला आहे. सीएनजी म्हणजेच कॉम्प्रेसङ नॅचरल गॅस याचे उत्पादन भारतामध्ये होते. त्यासाठी लागणारा कच्चा माल व इतर वस्तू हे सुद्धा भारतातच तयार होते. त्यामुळे हा दर आखाती देशातून निर्यात होणाऱ्या पेट्रोल व डिझेल या इंधनाची स्पर्धा करीत 91 रुपये प्रति किलोग्राम एवढा वाढलेला आहे. लवकरच हा दर शंभरी सुद्धा पार करेल. तेसुद्धा राज्य सरकारने यावरील टॅक्स कमी केलेला असताना. गॅसचे दर गगनाला भिडत आहे याचे आश्चर्य वाटते. हाच सीएनजी गॅस भारत बाहेरील देशांना सुद्धा निर्यात करतो. तरीसुद्धा बाहेरील कित्येक देशात याची किंमत साठ रुपये प्रति किलोग्रामच्या आसपास आहे. केंद्र सरकार तर्फे पेट्रोल व डिझेल वरील वाहनांऐवजी सीएनजी व इलेक्ट्रॉनिक वाहनांवर भर दिला जात आहे. सीएनजी 91 रुपये झाल्यामुळे रिक्षा चालकांचे रोज सुमारे 300 रुपये सीएनजीसाठी जातात. यामुळे रिक्षा चालकांवर आर्थिक संकट आले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे.
यावेळी शफिक पटेल म्हणाले भारत स्वातंत्र्याचे 75 वर्ष मोठा धुमधडाक्यात साजरी करत आहेत अशा परिस्थितीमध्ये रिक्षा चालक गोरगरिबावरती होणारा अन्याय दूर झाला पाहिजे त्यामुळे अनुदानाबाबत विचार व्हावा. अन्यथा तीव्र आंदोलन करू, अस इशारा यांनी दिला.