कर ही भरा आणि आरोग्यसेवा ही विकत घ्या हा कोणता न्याय ?
खाजगी कंपन्यांच्या घशात पालिकेची जमीन, हॉस्पिटल घालण्याच्या प्रस्तावावर आम आदमी पार्टीची टीका
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे महानगरपालिका वारजे येथे 700 खाटांचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभा करत आहे. त्यासाठी जागा पुणे महानगरपालिका उपलब्ध करून देणार आहे. तेथील हॉस्पिटलची इमारत उभा करण्यासाठी पुणे महानगरपालिका तब्बल ३५० कोटी रुपयांचे कर्ज काढणार आहे. कर्जाची हमी मनपाची असणार आहे तर सदर हॉस्पिटल उभारुन चालवण्यासाठी एका खाजगी संस्थेला देण्याचा प्रस्ताव पुणे महानगरपालिकेने पारित केला आहे.
या प्रस्तावाला आपचा विरोध आहे. पुणेकरांनी पालिकेला करही भरा आणि वरुन खाजगी रुग्णालयांप्रमाणे पीपीपी रुग्णालयातून आरोग्यसेवा ही विकत घ्या... हा कोणता न्याय ? असा प्रश्न *आम आदमी पक्षाचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार* यांनी उपस्थित केला आहे.
वारजे येथील संबंधित पीपीपी हॉस्पिटलचा प्रस्ताव हा पुणेकरांच्या हिताच्या विरोधी असून त्याला आम आदमी पक्षाचा तीव्र विरोध आहे. दर्जेदार आणि मोफत आरोग्य सेवा देणे हे पुणे महानगरपालिकेचे कर्तव्य असून पालिकेमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आली तर दिल्ली मॉडेलच्या धर्तीवर उत्तम दर्जाची हॉस्पिटल उभारली जातील व नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरवली जाईल असे मत *आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे* यांनी व्यक्त केले.
वारजे येथील या पीपीपी तत्वावरील मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या माध्यमातून ७०० पैकी काही खाटांवर सीजीएचएसच्या दराने आरोग्य सेवा पुणेकरांना विकत घ्यावी लागणार आहे तर राहिलेल्या खाटांवर खुल्या मार्केटच्या दराने आरोग्यसेवा पुणेकरांना विकत घ्यावे लागणार आहे. एकूणच काय तर पुणेकरांना विकत मल्टी स्पेशालिटी आरोग्य सेवा मिळावी यासाठी महानगरपालिका कोट्यावधी रुपयांचा भूखंड, हॉस्पिटलची इमारत आणि साडेतीनशे कोटी रुपयांच्या कर्जाची हमी ही खाजगी कंपनीच्या घशामध्ये घालणार आहे. हे कर्ज संबंधित खाजगी कंपनीने बुडवू नये यासाठी मनपा हॉस्पिटलचा विमा काढणार आहे. त्यासाठी एका खाजगी विमा कंपनीकडे विम्याचा हप्ता देखील पुणे महानगरपालिका भरणार आहे. एकंदरीतच हा पुणेकरांसाठी तोट्याचा व्यवहार असून या व्यवहारांमध्ये काही जणांचे हात ओले झाले असण्याची शक्यता देखील आम आदमी पक्षाने वर्तवली आहे.
पुणे शहरांमध्ये सुमारे 500 खाजगी हॉस्पिटल असताना अजून एक खाजगी हॉस्पिटल पुणेकरांच्या कराच्या पैशातून पुणे महानगरपालिका उभे करत असेल तर त्याचा कोणताही फायदा सर्वसामान्य पुणेकरांना होणार नसून हे हॉस्पिटल करदात्या पुणेकरांच्या मुळावरच येणार आहे अशी आम आदमी पक्षाची भूमिका आहे.