स्वस्त दराने गहू निर्यात करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारवर आली आता चढ्या दराने गहू विकत घेण्याची वेळ

 ग्राहक आणि देशांतर्गत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान !! 

दलालांना फायदा पोहचवण्यासाठी केंद्र सरकारची खेळी ??



प्रेस मीडिया लाईव्ह :


 पुणे : केंद्रातील भाजप सरकार हे अनेकदा शेतकरी विरोधी भूमिका घेत असल्यामुळे त्याचा मोठा तोटा शेतकऱ्यांना आणि पर्यायाने ग्राहकांना बसत आहे. याचे एक ताजे उदाहरण म्हणजे ज्या केंद्र सरकारने मार्च ते जून 2022 या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर कमी किंमतीत गहू निर्यात केला त्याच केंद्र सरकारने आता चढ्या किमतीने गहू आयात करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे गहू उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांचे मोठे नुकसान होणार आहे. 

मार्च 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयांमध्ये गव्हाची किंमत 20 रुपये प्रति किलो होती तर त्याच महिन्यात डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर 75.91 रुपये इतका होता. भारताने 2022 मध्ये अवघ्या काही महिन्यात 30 लाख टन गहू निर्यात केला. आता मात्र ऑगस्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात रूपयांमध्ये गव्हाची किंमत 40 रुपये प्रति किलो झाली आहे आणि या महिन्यात डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर 80 रुपये इतका झाला आहे.

भारतात सर्व साधारण माणशी दर महा 4.24 किलो गहू खाल्ला जातो. दरमहा भारतात 57 लाख टन गव्हाची गरज असते. निर्यातीनंतर देशांतर्गत गव्हाचा तुटवडा निर्माण होऊन किंमती वाढायला लागल्या आहेत. अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण असणाऱ्या भारतावर गहू आयात करण्याची नामुष्की त्यामुळे येऊन ठेपली आहे. एवढेच नाही तर हा आयात केला जाणारा गहू चढ्या दराने विकत घ्यावा लागणार आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरल्याने ही आयात आता अजूनच जास्त महागडी झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत ग्राहकांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. 

एकंदरीतच या प्रकरणाबद्दल आम आदमी पक्षाने संशय व्यक्त केला असून मार्च ते मे महिन्यामध्ये निर्यात केलेला गहू चढ्या दराने पुन्हा आयात करून काही दलालांचे उखळ पांढरे करण्याचा हा डाव तर नाही ना अशी शंका आम आदमी शेतकरी संघटनेचे सल्लागार श्रीकांत आचार्य यांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका शेतकऱ्यांना बसत असून या विरोधामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर संघटित करण्याचे काम *आम आदमी शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष बिपिन पाटील, राज्य संघटक बाबासाहेब चव्हाण, सचिव शिवाजी नाना पाटील,  दिलीप सुरवडे आणि सहसंघटक संदीप पाटील* यांच्या माध्यमातून सुरू केले आहे. 

केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा पर्दाफाश करण्यासाठी आम आदमी शेतकरी संघटनेद्वारे येत्या काही महिन्यात राज्याच्या विविध भागांमध्ये शेतकऱ्यांचे मेळावे आयोजित केले जाणार असल्याचे मत *आम आदमी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बिपिन पाटील* यांनी व्यक्त केले.



Post a Comment

Previous Post Next Post