गणेशोत्सवासाठी गावाला जाणार्‍या भाविकांकडून खासगी ट्रॅव्हल्स तिकिटाचे दुप्पट-तिप्पट दर आकारून प्रवाशांची प्रचंड लुटमार


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई - राज्य परिवहन विभागाच्या आदेशानुसार एस्.टी. बसेच्या दीडपटच दर आकरण्याचा शासनाचा निर्णय असतांना गणेशोत्सवासाठी गावाला जाणार्‍या भाविकांकडून खासगी ट्रॅव्हल्स तिकिटाचे दुप्पट-तिप्पट दर आकारून प्रवाशांची प्रचंड लुटमार करत आहेत.खासगी ट्रॅव्हल्सच्या संकेतस्थळांवर तिकिटांचे भरमसाठ तिकिटदर उघडपणे देण्यात आले आहेत. अशा प्रकारे नागरिकांची उघडपणे आर्थिक लुट चालू असूनही त्यांवर प्रशासनकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या 'सुराज्य अभियान'च्या वतीने मुंबईतील दादर (पूर्व) येथील खासगी ट्रॅव्हल्सच्या बुकींग केंद्रांच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये भाविकांची आर्थिक लुट करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

खासगी ट्रॅव्हल्स दरवाढीच्या विरोधात राज्य परिवहन विभागाकडे आणि पोलिसांकडे तक्रार करणारे अभिषेक मुरकुटे, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते सतिश कोचरेकर यांच्यासह समितीचे कार्यकर्ते आणि प्रवासी सहभागी झाले होते. या वेळी आंदोलकांनी घोषणा देत, हातात फलक धरत खासगी ट्रॅव्हल्सच्या विरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.

तिकिटदरात नियमबाह्य वाढ करून प्रवाशांची आर्थिक लूट करणार्‍या ट्रॅव्हल्सवर सध्या अस्तित्वात असलेल्या नियमानुसार प्रतिबंधात्मक आणि दंडात्मक कारवाई करूनही पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा त्यांच्याकडून होत असेल, तर अशा प्रकरणात भा.दं.वि. कलम 406 आणि 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात यावा, खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा, खासगी ट्रॅव्हल्स गाड्यांचे बुकिंग होणारी ठिकाणे आणि गाड्या सुटणारी ठिकाणे येथे शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार खासगी अधिकतम किती दर आकारता येईल, याचे फलक दर्शनी भागात लावण्यात यावेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि मोटार वाहन विभाग यांच्या संकेतस्थळावर नागरिकांच्या सोयीसाठी 'हेल्पलाईन' क्रमांक द्यावेत आदी विविध मागण्याही या आंदोलनात करण्यात आल्या.

Post a Comment

Previous Post Next Post