चोरट्यांनी देवीचे दागिने रोख रक्कम तसेच मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजही लंपास केले
प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील हालेवाडी गावामधील भरवस्तीमध्ये असणाऱ्या लक्ष्मी मंदिरात जबरी चोरी झाली आहे. चोरट्यांनी देवीचे दागिने रोख रक्कम तसेच मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजही लंपास केले आहे.या घटनेनंतर हालेवाडी गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मी देवीचे मंदिर गावच्या मध्यभागी हालेवाडी-वडकशिवाले रस्त्यालगत आहे.
पुजारी सुनिल पाटील देवीच्या पुजेसाठी गेले असता मंदिराचा दरवाजा उचकटलेला दिसून आला. देवीच्या अंगावर घालण्यात आलेले दागिन नसल्याचे पाटील यांच्या निर्दनास आले. त्यांनी तातडीने पोलिसांना व ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी राजीव नवले, आजऱ्याचे सहायक निरीक्षक सुनील हारुगडे, सहायक फौजदार बी. एस. कोचरगी यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोल्हापूरहून श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वानाने गावातील चौकापर्यंत माग काढला. तेथे श्वान घुटमळले.
हालेवाडी गावचे भाविक सुरेश पाटील यांनी देवीसाठी कर्णफुले, सोन्याची पट्टी, मंगळसूत्र, मोठे मंगळसूत्र जोडवी, नथ असे सोन्याचे 14 तोळे दागिने घातले होते. तसेच दागिन्यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त 50 हजार रुपये खर्च करून सीसीटीव्ही बसवले होते. चोरट्यांनी बाहेरील गेटचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला. कॅमेऱ्याची दिशा बदलून ती भिंतीच्या दिशेने केली. चोरट्यांनी देवीच्या अंगावरचे दागिने, सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेला.