प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : राष्ट्रध्वज आपल्या सर्वांचा सन्मान व एकतेचे प्रतिक आहे. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ 15 ऑगस्ट 2023 पर्यंत साजरा करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. या अभियानामध्ये लोकसहभाग महत्वाचा असून जनतेने या अभियानात स्वयंस्फूर्तीने आपला सहभाग नोंदवावा. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट 2022 या दरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्य लढ्यात ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच देश प्रेमाची ज्योत प्रत्येकाच्या मनात तेवत ठेवण्यासाठी आपल्या घरावर तिरंगा फडकवून प्रत्येक नागरीकांनी ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानात आपला सहभाग नोंदवावा. या अभियानात प्रत्येकाने ध्वज संहितेचे पालन करुन राष्ट्रध्वजाचा सन्मान राखून घरोघरी तिरंगा फडकवुया..
केंद्रीय गृह विभागाच्या दि. 30 डिसेंबर 2021 रोजीच्या अधिसूचनेन्वये भारतीय ध्वज संहिता 2002 भाग-1 मधील परिच्छेद 1.2 मधील राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या लोकर, सूत, सिल्क, खादी कापडापासून बनविलेला असेल, या तरतुदीमध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत, पॉलिस्टर, लोकर, सिल्क, खादी पासून बनविलेल्या कापडाचे असावेत, असा उल्लेख केला आहे. या बदललेल्या तरतुदीनुसार तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर घरोघरी तिरंगा या अभियानामध्ये करता येईल.
अभियानामध्ये ध्वज संहितेचे काटेकोरपणे पालन करावे. राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये याची दक्षता सर्वांनी घ्यावी. त्यासाठी सातत्याने जाणीव जागृती निर्माण करावी. तसेच प्लास्टिक ध्वजाचा वापर होऊ नये, यासाठी आपण सर्वांनी कटाक्षाने खबरदारी घेणे गरजेचे आहे.
घ्यावयाची काळजी
• राष्ट्रध्वजाचा आकार आयताकार असावा.
• राष्ट्रध्वज लांबी : रुंदीचे प्रमाण हे 3 : 2 असे असावे.
• राष्ट्रध्वजमध्ये सर्वात वर केशरी, मध्यभागी पांढरा व खाली हिरवा रंग असावा. मध्यभागी पांढऱ्या पट्टीवर 24 रेषांचे गोलाकार नेव्ही ब्ल्यू रंगाचे अशोकचक्र असावे.
• प्लास्टिक किंवा कागदी झेंडा वापरु नये,
• कोणतीही सजावटी वस्तु लावू नयेत.
• राष्ट्रध्वज फाटलेला, मळलेला व चुरगळलेला लावण्यात येऊ नये.
• एकाच वेळी इतर ध्वजासोबत एकाच काठीवर राष्ट्रध्वज फडकवू नये.
• राष्ट्रध्वजापेक्षा इतर कोणताही ध्वज उंच लावू नये.
• तोरण, गुच्छे अथवा पताका म्हणून अन्य कोणत्याही प्रकारचे शोभेसाठी उपयोग करु नये.
• प्रत्येक नागरिकाने ध्वज संहितेचे पालन करावे.
• अर्धा झुकलेला, फाटलेला, कापलेला झेंडा कुठल्याही परिस्थितीत लावला जाऊ नये.
• तिरंगा झेंडा उतरविताना काळजीपूर्वक सन्मानाने उतरवावा.
• घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत लावण्यात येणारे झेंडे उपक्रम संपल्यानंतर प्रत्येकाने सन्मानाने व सुरक्षित ठेवावे.
• उपक्रम संपल्यानंतर ध्वज फेकला जावू नये, तो सन्मानाने जतन करुन ठेवावा.
चला तर मग… घरोघरी तिरंगा या उभियानात प्रत्येक नागरीकांनी आपला सहभाग नोंदवून आपल्या घरावर तिरंगा फडकवूया आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सामील होवूया...!
विभागीय माहिती कार्यालय,कोल्हापूर