शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या विचारांना अभिवादन
प्रेस मीडिया लाईव्ह :
जयसिंगपूर शहरातील पुरोगामी सम विचारी संघटनांनी शहीद डॉ.नरेंद्र दाभोळकर यांना अभिवादन व विचारांचा जागर करण्यासाठी मॉर्निंग वॉक रॅली काढली.
जयसिंगपूर शहरातील अनेक पुरोगामी सम विचारी संघटना या सामाजिक विचार व कृतींच्या बाबतीत नेहमीच सजग असतात. त्या अनुषंगाने विविध प्रकारचे आंदोलन, मोर्चे, मॉर्निंग वॉक रॅली व निषेध फेऱ्या काढत असतात. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष शहीद नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतींना अभिवादन व पुरोगामी विचारांचा जागर करण्यासाठी दसरा चौकातून मॉर्निंग वॉक रॅली काढण्यात आली.
सदरची रॅली दसरा चौक - स्टेशन रोड मार्गे गांधी चौक - तेथून झेले बिल्डींग - जुनी नगरपालिका व शेवटी क्रांती चौकात रॅली संपन्न झाली.
यावेळी प्रसिद्ध धन्वंतरी डॉ.महावीर अक्कोळे ,डॉ.चिदानंद आवळेकर,डॉ. अजित बिरनाळे, डॉ. अतिक पटेल,साहित्यिका निलम माणगावे, कॉम्रेड रघुनाथ देशिंगे,प्रा. शांतारामबापू कांबळे,प्र. प्राचार्य डॉ. चव्हाण, सेवादलाचे बाबासाहेब नदाफ या मान्यवरांच्या भाषणातून पुरोगामी विचारांचा जागर करण्यात आला.
सकाळी साडे ६ वाजता रॅलीला सुरुवात होवून यामध्ये पुरोगामी चळवळीतील प्रसिद्ध डॉक्टर, प्राचार्य, साहित्यिक, प्राध्यापक, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.यावेळी रॅलीतील काहींच्या हातामध्ये विचार प्रवण करणारे फलक यामध्ये पद्मश्री डॉ.दाभोळकर,कलबुर्गी, गोविंदराव पानसरे यांना अभिवादन करण्यासाठी डिजिटल फलकही होते. यावेळी विविध घोषणांच्या आवाजाने परिसर दुमदुमला होता.त्यामुळे स्वतःहून नागरिकांचा रॅलीत सहभाग वाढत होता.विशेष म्हणजे 'शाहू फुले आंबेडकर , आम्ही सारे दाभोळकर' - जितेंगे लढेंगे - लढेंगे जितेंगे' या सारख्या घोषणा देण्यात आल्या.सदरची रॅलीक्रांती चौकात आल्यानंतर यावेळी मान्यवरांची भाषणे होवून रॅलीची सांगता करण्यात आली.
सदर रॅलीमध्ये संवेदनशील ज्येष्ठ कार्यकर्ते एफ.वाय.कुंभोजकर, रमेश माणगावे, अशोक शिरगुप्पे,प्रा. ए.एस.पाटील,हेरवाडे,प्रा. प्रकाश मेटकर, प्रा.सुनिल बनसोडे, प्रा.डॉ.तुषार घाटगे, सचेतन बनसोडे, संदीप शेडबाळे, श्रीकांत कांबळे, प्रा. बाळगोंडा पाटील,प्रा. डॉ. ढबे, प्रा.कबीर कुंभार, अमित माणगावे, सुकुमार बामणे, शुक्राचार्य उर्फ बंडू उरुणकर यांच्या सह समाजवादी प्रबोधिनी जयसिंगपूर , महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल, लाल बावटा कामगार युनियन व सर्व पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.