भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा आशय आणि भारतीय राज्यघटनेचे तत्वज्ञान घेऊन आपण पुढील वाटचाल केली पाहिजे.. प्रसाद कुलकर्णी



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.१४,भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना आपण भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाचे अवलोकन, वर्तमानाचे वास्तव आणि भविष्याची दिशा यांचा एकत्रित विचार करण्याची गरज आहे.औद्योगिक बाजारपेठेच्या माध्यमातून गुलामगिरी कशी येते आणि साम्राज्यवादी कसे मुजोर  होतात याचा अनुभव ब्रिटिश साम्राज्यशाहीतून आपण घेतलेला आहे. इथल्या जनतेचे सर्वांगीण शोषण करणाऱ्या या हुकूमशाही विरुद्ध आपण १८५७ ते १९४७ हा  नव्वद वर्षाचा लढा दिला. निरनिराळ्या प्रवाहाद्वारे शब्दशः लाखो लोकांनी त्यात भागीदारी केली आणि हजारोंनी बलिदान केले. त्यातून हा देश स्वतंत्र झाला आहे.स्वतंत्र झाल्यानंतर देशाची पुढील दिशा ठरवणारी भारतीय राज्यघटना आपण तयार केली. म्हणूनच भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा आशय आणि भारतीय राज्यघटनेचे तत्वज्ञान घेऊन आपण पुढील वाटचाल केली पाहिजे, असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या इचलकरंजी शाखेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानात  "भारतीय स्वातंत्र्य लढा आणि संविधान " या विषयावर बोलत होते. प्रास्ताविक कॉ. धोंडीबा कुंभार यांनी केले. विश्वास फरांदे यांच्या हस्ते प्रसाद कुलकर्णी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले, स्वातंत्र्य आंदोलनात धर्मांध विचारधारा सहभागी नव्हत्या. त्या ब्रिटिशांशी लांगुलचालन करत होत्या. फिरंग्यांची तळी उचलणाऱ्यांना तिरंग्याचा जयघोष करावा लागला हे अमृत महोत्सवी वर्षातील सर्वाधिक मोठे संवैधानिक यश आहे. भारतीय राज्यघटना ही स्वतंत्र व स्वायत्त घटना समितीने तयार केलेली आहे .या घटनेवर भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील लोकशाही व उदारमतवादी विचारधारा ,महात्मा गांधींची विचारधारा, डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांचा समाज सुधारणावाद आणि पंडित नेहरूंचा समाजवाद अशा विविध प्रवाहांचा प्रभाव नैसर्गिकपणे पडलेला आहे. 'आम्ही भारताचे लोक' अशी सुरुवात करून ही घटना' स्वतः प्रत अर्पण ' करण्याची संविधानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनच तो जगातला एक महत्त्वाचा सामाजिक दस्तऐवज ठरतो.

प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले ,राज्यघटनेचा सरनामा लोक हीच भारताची खरी शक्ती आहे हे स्पष्ट करतो. भविष्यकालीन वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरणारी मूलभूत मूल्ये सरनाम्याच्या मध्यभागी आढळतात .संपूर्ण स्वातंत्र्य, लोकांचे सर्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही आणि संघराज्यीय एकात्मता ही ती मूल्ये आहेत. राज्यघटनेतील तरतुदींकडे जाण्यासाठी दिशा दाखवणारी सरनामा ही एक कमान आहे. या कमानीवर अथवा प्रवेशद्वारावर दाखवलेल्या मार्गाने जाणे ही आपली जबाबदारी आहे, मूलभूत कर्तव्य आहे.ते आपण स्वतःहून स्वीकारलेलं आहे. आणखी पंचवीस वर्षांनी स्वातंत्र्याचा शताब्दी महोत्सव होईल. त्यावेळी जर या विश्वामध्ये सर्वार्थाने भारत प्रगत ,बलशाली व्हायचा असेल तर भारतीय राज्यघटनेच्या चौकटीतच राज्यकर्त्यांचा व नागरिकांचा वर्तन व्यवहार झाला पाहिजे. याची पक्की खूणगाठ  या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वांनी मनाशी बांधली पाहिजे.प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या दीड तासाच्या भाषणामध्ये भारतीय स्वातंत्र्य आंदोलन, भारतीय राज्यघटना, तिची वाटचाल गेल्या पंच्याहत्तर वर्षातील देशाची वाटचाल, वर्तमान परिस्थिती आणि भविष्यकालीन दिशा याचा सखोल ऊहापोह केला. या कार्यक्रमाला बाळू भिसे, सागर बाणदार,सुदर्शन शिंदे, शिवाजी साळुंखे, बबन आवळे, विजय चौगुले ,रावसाहेब निर्मळे, आनंद कांबळे ,शिवाजी लोहार ,रामा सुतार, विश्वनाथ शेरला, अन्वर पटेल ,रोहित दळवी ,राजू कोन्नूर, किरण कटके ,वसंतराव नवनाळे,माधुरी गुरव, नीता भिसे,ललिता,नडगिरे,रामदास कोळी, दत्ता माने, नाना पारडे, सदा मलाबादे, बजरंग लोणारी, शिवाजी शिंदे, संदीप चोडणकर, सचिन पाटोळे, रामभाऊ ठिकणे,संभाजी गुरव ,गौस अत्तार, नौशाद शेडबाळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post