प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : / प्रतिनिधी
'बदामी बनशंकरी माता की जय' च्या जयघोषात आणि समाज बांधव, भाविकांच्या अभूतपूर्व उत्साहात श्री बनशंकरी देवी उत्सवमूर्ती प्रतिष्ठापना सोहळा पार पडला. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात विविध धार्मिक विधींसह कार्यक्रम संपन्न झाले. महाप्रसादाने या उत्सवाची सांगता झाली.
येथील गावभागातील श्री बनशंकरी देवीचे मंदिर हे जागृत देवस्थान असून मंदिराला सुमारे तीनशे वर्षांचा इतिहास लाभला आहे. कोष्टी समाजाची कुलस्वामिनी म्हणूनही श्री. बनशंकरी (शाकंभरी) देवीची उपासना केली जाते. हटकर कोष्टी समाजाच्या अधिपत्याखाली असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार २००१ साली करण्यात आला. श्री बनशंकरी ट्रस्टच्यावतीने आयोजित या मंदिरातील देवी उत्सवमूर्ती प्रतिष्ठापना सोहळा शुक्रवार आणि शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला.
शुक्रवारी सकाळी मंगळवार पेठेतील श्री. चौंडेश्वरी मंदिरापासून श्री. बनशंकरी (शाकंभरी) देवी उत्सवमूर्ती पालखी सोहळ्याची सुरुवात झाली. ढोलताशांच्या गजरात, 'रामलिंग चौंडेश्वरी माता की जय, बदामी बनशंकरी माता की जय' च्या जयघोषात, कोष्टी बांधव आणि भाविकांच्या अमाप उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करण्यात आला. 'श्री बनशंकरी' लिहिलेल्या टोप्यामुळे मिरवणुकीला वेगळी आकर्षकता लाभली. यानंतर गोरज मुहूर्तावर उत्सवमूर्ती प्रतिष्ठापना विधीस स्वस्ति पुण्याह वाचनाने प्रारंभ होवून नवदुर्गा-श्री चक्रमंडल पूजन शयनाधिवास झाला.
तर शनिवारी पहाटे रुद्राभिषेक, सकाळी अलंकार, पंचहोम आदी विधी पार पडले. महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली. यावेळी श्री. बनशंकरी देवीची मनमोहक पूजा बांधण्यात आली होती. तर आकर्षक फुलांची रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. दोन दिवस चाललेल्या या उत्सवात कोष्टी समाज बांधव, भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रतिष्ठापना सोहळा यशस्वीतेसाठी हटकर कोष्टी समाज, श्री बनशंकरी ट्रस्ट, युवक मंडळ, महिला मंडळ तसेच बनशंकरी मंडळ यांचे योगदान मिळाले.