केवळ 'इव्हेंट ' नको तर 'मूव्हमेंट' समजून घेऊ

 वाचकपत्र


प्रेस मीडिया लाईव्ह :

भारतीय स्वातंत्र्याच्याअमृतमहोत्सवा निमित्ताने राष्ट्रप्रेम व्यक्त करणार उपक्रम होत आहेत ही चांगली बाब आहे. ' घर घर तिरंगा ' हा त्यातीलच एक उपक्रम आहे. हा उपक्रम राबवत असताना तिरंगा ध्वज आणि त्याची ध्वज संहिता याचे गांभीर्याने पालन करणे एक भारतीय नागरिक म्हणून आपणा सर्वांचे नैतिक कर्तव्य आहे. पहिल्या स्वातंत्र्य दिनापूर्वी म्हणजे२२ जुलै १९४७ रोजी भारताच्या घटना समितीने आपल्या बैठकीत 'तिरंगा ध्वज' हा भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज राहील असा निर्णय घेतला. आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी म्हणजे पहिल्या स्वातंत्र्यदिनी हा तिरंगा फडकवला गेला. पुढे २६ जानेवारी १९५० रोजी भारत लोकसत्ताक झाला. तेव्हा आणि तेव्हापासून आजतागायत कोणत्याही बदलाशिवाय हाच तिरंगा कायम राहिलेला आहे.२४ जानेवारी १९५० रोजी भारतीय घटना समितीने रवींद्रनाथ टागोर यांच्या 'जन गण मन 'या गीताचा अधिकृत 'राष्ट्रगीत' म्हणून स्वीकार केला आहे.तसेच बंकीमचंद्र चटोपाध्याय यांचे 'वंदे मातरम ' हे  गीत 'राष्ट्रगान'म्हणून स्वीकारले गेले आहे.२६ जानेवारी १९५० रोजी सामर्थ्य, धैर्य व आत्मविश्वास सूचित करणारे राष्ट्रीय बोधचिन्ह आपण स्वीकारले. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील तीन सिंहांचा उर्ध्वभाग,त्यांच्या खालील धम्मचक्र, उजवीकडील वृषभ आणि डावीकडील घोडा हे घटक त्याखाली उपनिषदात 'सत्यमेव जयते' हा शब्द समुच्चय अशी योजना केलेली आहे. हे राष्ट्रीय बोधचिन्ह आपण स्वीकारले आहे.  सर्वच राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान राखणे हे देशाचा नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. अमृत महोत्सव साजरा करत असताना हा देश ' मुव्हमेंट ' करून स्वतंत्र झाला आहे,उभा राहिलेला आहे, विकसित झालेला आहे. त्या इतिहासाचे भान , मान, गान सांभाळणे अतिशय महत्त्वाचे आहे. हा केवळ आनंदाचा ' इव्हेंट ' नाही तर ती जाज्वल्य इतिहासाची,त्यागाची, समर्पणाची,लोकशक्तीची, अभिमानाची ' मुव्हमेंट 'आहे याचा क्षणभरही विसर पडू देऊ नये. आपले भारतीयत्व हेच आपले राष्ट्रीयत्व आहे.


प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९०)

Prasad.kulkarni65@gmail.com


-----------------------     ---------------

Post a Comment

Previous Post Next Post