इचलकरंजीत भाजपच्या हर घर तिरंगा जागृती अभियान रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

 रॅलीच्या माध्यमातून माजी आमदार सुरेश हाळवणकर पुन्हा एकदा सक्रिय 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी येथे भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या हर घर तिरंगा जागृती अभियान रॅलीस शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियान रॅलीच्या माध्यमातून माजी आमदार सुरेश हाळवणकर हे आज पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसून आले.दुचाकीवर बसून श्री. हाळवणकर यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला. शेकडो कार्यकर्ते तिरंगा झेंडा घेऊन या रॅलीत सहभागी झाले होते. संपूर्ण वातावरण तिरंगामय  होवून भारत माता की जय यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता

केंद्र सरकारने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देशभरात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे या अभियानाच्या जनजागृतीसाठी प्रशासनाबरोबरच राजकीय पक्ष , सामाजिक संस्था व संघटनांनी मोठी कंबर कसली आहे.तसेच सर्व नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावून देशाप्रती निष्ठा ,प्रेम व अभिमान व्यक्त करावा ,असे आवाहन केले आहे.याच अनुषंगाने इचलकरंजी येथे भाजपच्या वतीने आज शुक्रवारी “हर घर तिरंगा” अभियानाच्या जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली. प्रारंभी भाजपच्या कार्यालयापासून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी डोक्याला फेटा ,दुचाकीस तिरंगा ध्वज लावून भाजपचे पदाधिकारी , कार्यकर्ते व नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. देशभक्तीपर गीताबरोबरच भारत माता की जय अशा विविध घोषणांनी संपूर्ण वातावरण तिरंगामय व देशभक्तीने भारावून गेले होते.

 सदर रॅली शिवतीर्थ परिसरात आल्यानंतर माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याच ठिकाणी महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी जनजागृती रॅलीचे स्वागत केले.तसेच फेरीवाल्यांच्या वतीने गाडीचे पूजन करण्यात आले त्यानंतर जनता चौक, झेंडा चौक यासह विविध परिसरात रॅली काढण्यात आली. मरगुबाई मंदिरजवळ रॅली आल्यानंतर प्रमोद बचाटे यांनी “हर घर तिरंगा” अभियान रॅलीवर पुष्पवर्षाव केला. तीन बत्ती चौक, शाहू पुतळा, डेक्कन चौक मार्गे शहापूर चौकात रॅली आल्यानंतर माजीी नगरसेवकांच्या माध्यमातून तिरंगा रॅलीवर पुष्प वर्षाव करण्यात आला.

 त्यानंतर थोरात चौकामध्ये या भव्य रॅलीची सांगता करण्यात आली. सुरुवातीपासूनच माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी दुचाकीवर बसून या रॅलीमध्ये सहभाग घेतला.भाजप पक्षाच्या नेहमीच्या कामात व्यस्त असणारे हाळवणकर हे आज “हर घर तिरंगा” अभियान या रॅलीच्या माध्यमातून सक्रिय झाल्याची चर्चा होती.आगामी काळात महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर श्री. हाळवणकर हे पुन्हा सक्रिय झाल्याने राजकीय क्षेत्रात अधिकच चर्चा रंगत आहे. या रॅली मध्ये भाजपाचे शहराध्यक्ष अनिल डाळ्या,मिश्रीलाल जाजु, तानाजी पोवार, हेमंत वरुटे ,मनोज साळुंखे, युवराज माळी, अरुण कुंभार, अरविंद शर्मा, भगवान बरगाले ,सुजय पवार , प्रविण रावळ ,दीपक पाटील ,अमर कांबळे, राजेंद्र पाटील, राजु भाकरे, किसन शिंदे, सचिन पवार, उत्तमसिंग चव्हाण, भरत जोशी, अमृत भोसले, शहाजी भोसले, शिवानंद रावळ, पुनम जाधव, प्रविण पाटील, अरविंद चौगुले, प्रमोद बचाटे, शुभम बर्गे आदींसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post