प्रेस मीडिया लाईव्ह :
अमरावती : धारणी येथील उपजिल्हा रूग्णालयातील रक्तपेढी व सिटी स्कॅन कक्षाचे काम लवकरात लवकर पुर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले.
धारणी येथे नवसंजीवनी बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी त्या बोलत होत्या.बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली, तसेच सुशीला नायर रुग्णालयालाही भेट दिली. प्रकल्प अधिकारी सावन कुमार, धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे, चिखलदऱ्याचे तहसीलदार मदन जाधव व दोन्ही तालुक्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
श्रीमती कौर म्हणाल्या की, मेळघाटातील आरोग्य यंत्रणा अद्ययावत करावी. उपजिल्हा रूग्णालयातील रक्तपेढी व सिटी स्कॅन कक्षात आवश्यक यंत्रणा उपलब्ध करुन घेऊन काम लवकरात लवकर पुर्ण करावे. यावेळी त्यांनी पाणीपुरवठा, रस्ते, वीज पुरवठा, आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे आदी बाबींचा आढावा घेतला.
त्यानंतर त्यांनी बिजूधावडी येथे भेट देऊन ई- पीक पाहणी प्रात्यक्षिकात सहभागी होऊन प्रत्येक बाबीची माहिती घेतली व अधिकारी-कर्मचारी, शेतकरी बांधव यांच्याशी संवाद साधला. या प्रक्रियेत कृषी पतपुरवठा सुलभ करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई देणे यासाठी पीक पेरणीची माहिती शेतकऱ्यांनी स्वतः उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने ई-पीक पाहणी उपयुक्त ठरणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
Amravati Collector