प्रेस मीडिया लाईव्ह :
टाकळीवाडी :-निर्मळे निर्मळे
दि . १८ फेब्रुवारी २०२२ रोजी , मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात आपली नोकरी बजावत असताना श्री संदीप सुभाष निर्मळे (प्रधान तिकीट संग्राहक, सी. एस.एम. टी.) यांना आपल्या दैनंदिन तिकीट चेकिंग कामकाजा दरम्यान फलाट क्र. १४ वर आलेल्या, ११४०२ नांदेड-मुंबई, नंदीग्राम एक्सप्रेस ची तपासणी करत असताना एक युवक व युवती असे सहप्रवासी आढळून आले. त्यापैकी युवक प्रौढ तर युवती अल्पवयीन होती. त्यांच्याकडे तिकीट विचारणा केली असता , ती अल्पवयीन मुलगी थोडी गोंधळलेली आणि घाबरलेली वाटली. काही तरी गडबड आहे अशी शंका आल्याने संदीप निर्मळे त्या प्रवाशांना आणखी काही प्रश्न विचारत सुरक्षितपणे टीसी कार्यालयात घेऊन गेले. तिथे थोडी अधिक माहिती घेतल्यावर आणि त्या अल्पवयीन मुलीच्या पालकांशी फोन वर चर्चा केल्यानंतर , ती अल्पवयीन मुलगी नांदेड जिल्ह्यातील भोकर भागातून घरातून पळून आल्याचे आणि तशी कायदेशीर लेखी तक्रार तिच्या पालकांनी मूळगावी केल्याचे निदर्शनास आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हेड टीसी संदीप निर्मळे यांनी त्या अल्पवयीन मुलीला पुढील कार्यवाहीसाठी रेल्वे पोलीस, सीएसएमटी यांच्या कडे सुखरूप ताब्यात दिले. घरातून पळून आलेल्या त्या अल्पवयीन मुलीची भेट तिच्या पालकांशी करून देण्यात संदीप निर्मळे यांनी मोलाचे योगदान दिले आणि आपल्या दैनंदिन नोकरीच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्य जपण्याचे काम केले.
तसेच ९ एप्रिल ,२०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या फलाट क्र १५ वर आपली नोकरी बजावत असताना पुन्हा एकदा एक अल्पवयीन युवक विनातिकीट ,गोंधळलेल्या अवस्थेत संदीप निर्मळे यांच्या निदर्शनास आला. त्याला विश्वासात घेऊन त्याची सखोल चौकशी केल्यानंतर तो अल्पवयीन मुलगा कर्वे नगर , कलीना ,मुंबई येथील आपल्या राहत्या घरून पळून आल्याचे स्पष्ट झाले.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हेड टीसी संदीप यांनी त्या अल्पवयीन मुलाला पुढील कार्यवाहीसाठी चाईल्ड केअर संस्था आणि लोहमार्ग पोलीस सीएसएमटी यांच्याकडे सुखरूप ताब्यात दिले.
संदीप निर्मळे यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना ७ जुलै ,२०२२ रोजी मध्य रेल्वे च्या वाणिज्य विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री गौरव झा सर आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (टीसी विभाग) श्री डगलस मेनेझिस सर यांच्या हस्ते मुंबई येथे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.