वर्षभरात उखडला 50 कोटींचा खोपोली खालापूर रस्ता, रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता कळेना



प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा :  सुनील पाटील

 एक्स्प्रेस वेबरोबरच मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील  प्रवास सुसाट व्हावा याकरिता खोपोली ते खालापूर या आठ किमी मार्गाचे नुकतेच चौपदरीकरण करण्यात आले. मात्र 50 कोटी रुपये खर्च करून बांधलेला हा रस्ता वर्षभरातच उखडला आहे. एमएसआरडीसी अधिकारी व ठेकेदाराच्या पापामुळे या मार्गावर ठिकठिकाणी दोन दोन फुटांचे खड्डे पडले असून अक्षरश: चाळणच झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता असा प्रश्न या मार्गावरून प्रवास करताना पडतो. गाड्या चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने दीड महिन्यात जवळपास तब्बल 20 दुचाकीस्वारांचा अपघात झाला आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने मुंबई-पुणे जुन्या मार्गावरील खालापूर फाटा ते खोपोली तसेच खोपोली विश्रामगृह ते बोरघाट पायथा असा आठ किमी अंतराच्या चौपदरीकरणासाठी 50 कोटी रुपये खर्चाचा ठेका इगल इन्फ्रा इंडिया या ठेकेदाराला दिला होता.

यासंदर्भात 23 डिसेंबर 2016 रोजी निविदा काढून 18 महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले गेले, परंतु तीन वर्षे उलटूनही हे काम पूर्ण केले नव्हते. त्यामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत होत्या. याबाबत खोपोलीकरांनी आंदोलन केल्यानंतर रखडलेले हे काम 2020 मध्ये पूर्ण झाले. मात्र निकृष्ट कामामुळे दरवर्षी थोड्याश्या पावसातच हा रस्ता उखडत असून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

कागदावरच केले वृक्षारोपण!

चौपदरीकरण करताना शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली होती. यामध्ये खालापुरातील-192, खोपोली-212, हाळ ग्रामपंचायत-15 झाडे तोडण्यात आली होती. नियमाप्रमाणे या झाडांच्या बदल्यात एकास पाच झाडे एका महिन्यात लावण्याचे बंधन घालण्यात आले होते, परंतु अजूनही हे वृक्षारेपण कागदावरच आहे. याबाबत पर्यावरणप्रेमींनी अनेकदा आवाज उठवला आहे. मात्र ‘एमएसआरडीसी अधिकाऱ्यांना हाताशी धरून ठेकेदार वेळकाढूपणा करत असल्याने संताप व्यक्‍त होत आहे.

काळ्या यादीतील ठेकेदाराला दिले काम

‘एमएसआरडीसीचे अधिकारी व इगल इन्फ्रा कंपनीच्या साटेलोट्यामुळे सुरुवातीपासूनच या चौपदरीकरण कामाची पुरती वाट लागली आहे. विशेष म्हणजे इगल इन्फ्रा कंपनीने सब कॉन्ट्रॅक्टर नेमताना ब्लॅक लिस्ट असलेल्या ठेकेदाराला काम दिले. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा आवाज उठवूनदेखील प्रशासन जाणीवपूर्वक गप्प राहिले. यामुळे आठ किलोमीटरचे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून जुनाच रस्ता बरा होता अशी म्हणण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post