पनवेल तालुक्यातील रेल्वे मार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा

 मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य अभिजित पाटील यांची मागणी.

प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा :  सुनील पाटील

तालुक्यातील आपटा गावाच्या हद्दीतील पाताळगंगा नदीवर रेल्वेपुलालगत पादचारी जोडपूल तात्काळ बांधण्यात यावा. तसेच रेल्वे अपघात घडल्यास त्याबाबत योग्य तपास करण्यासाठी तपास यंत्रणेला मदत व्हावी या उद्देशाने रेल्वेचे इंजिन आणि शेवटच्या डब्याला उच्चप्रतिचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी झोनल रेल्वे युजर्स कन्सलटेटीव्ह कमिटीचे सदस्य अभिजित पां पाटील यांनी केली. ते क्षेत्रीय रेल उपयोगकर्ता परामर्शदात्री समितीच्या बैठकीदरम्यान पनवेल तालुक्यातील रेल्वे मार्गावर घडणाऱ्या अपघाताबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात बोलत होते. झोनल रेल्वे युजर्स कन्सलटेटीव्ह कमिटीची बैठक नुकतीच मुंबई येथील छ. शिवाजी महाराज टर्मिनस येथील सभागृहात मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिल लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदार उमा खापरे, सल्लागार समिती सदस्य अभिजित पाटील, एनआरयुसीसीचे नवनिर्वाचित सदस्य अजयकुमार दुबे, डॉ.आसिफ पटेल, रवींद्र पाटील यांच्यासह सर्व सल्लागार समिती सदस्य आणि मध्य रेल्वेचे अधिकारीवर्ग उपस्थित होते.

         पनवेल तालुक्यातील आपटा गावाजवळ असणाऱ्या पाताळगंगा नदीवरील रेल्वे पुलावर आजपर्यंत ५० हुन अधिक अपघात घडले आहेत. यात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोकण रेल्वे अस्तित्वात आल्यापासून या रेल्वे पुलावर पादचारी जोडपूल नसल्याने आपटा व पंचक्रोशीतील गावे आणि आदिवासी वाड्यांमधील नागरिकांना जाताना १२ ते १५ किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. परंतु नदीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जोडणाऱ्या गावांना या पुलाच्या वापरामुळे हेच अंतर अवघ्या १० ते १५ मिनिटांमध्ये पार करता येते. परंतु याठिकाणी रेल्वे पुलाला पादचारी जोडपूल नसल्याने अनेकदा पादचाऱ्यांना अपघातात नाहक आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे या रेल्वेपुलाला जोडून पादचारी जोडपूल बांधावा अशी मागणी सल्लागार समिती सदस्य अभिजित पाटील यांनी केली.

        दि.७ फेब्रुवारी २०२२ रोजी आपटे गावातील एक तरुण दाम्पत्य हे रेल्वे पूल पार करताना याच रेल्वे पुलावर दुर्दैवी अपघात होऊन मृत्यू झाला होता. परंतु हा अपघात नेमका कसा झाला, अपघातात दाम्पत्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला याबाबत तपास करताना तपास यंत्रणेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे रेल्वे अपघाताची योग्य माहिती मिळण्यासाठी रेल्वे इंजिनचा डब्बा आणि शेवटच्या डब्ब्यावर उच्चप्रतिचा सीसीटीव्ही कॅमेरा बसवल्यास रेल्वे मार्गावर झालेला अपघात हा घातपात, आत्महत्या, रेल्वेची धडक, पादचाऱ्यांचा हलगर्जीपणा किंवा अन्य कोणत्या कारणाने झाला आहे याबाबत योग्य माहिती मिळेल आणि तपासाला गती मिळेल, या हेतूने सदरची मागणी अभिजित पाटील यांनी रेल्वे महाप्रबंधक यांच्याकडे बैठकीत मागणी केली.=रायगडचा युवक

Post a Comment

Previous Post Next Post