अग्निशमन दलाच्या पथकाने मराठे कुटुंबातील सर्व सदस्य तसेच त्यांचा लाडका कुत्रा यांची सुखरुप सुटका केली.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : खडकीच्या बोपोडी परिसरात हॅरिस पुलाखाली एक कार पाण्यात अडकली.कारमध्ये विंग कमांडर एस. एस. मराठे, त्यांची पत्नी आणि दोन मुले यांच्यासह मराठे कुटुंबाचा लाडका कुत्रा होता. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनेची माहिती मिळताच मदतकार्य सुरू केले आणि मराठे कुटुंबातील सर्व सदस्य तसेच त्यांचा लाडका कुत्रा यांची सुखरुप सुटका केली.
पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पुण्यात पावसाची तीव्रता वाढल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यामुळे बोपोडी येथे हॅरिस पुलाखालील रस्ता पाण्याखाली गेला. विंग कमांडर एस. एस. मराठे यांना पाण्याचा अंदाज आला नाही. गाडी रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून काढता येईल असा विचार करून मराठे कार चालवत होते. पण हॅरिस पुलाखाली एके ठिकाणी गाडी पाण्याच्या संपर्कात आली आणि अडकून पडली.
परिस्थितीचा अंदाज येताच मराठे यांनी त्यांच्या दोन मुलांना छत्री देऊन कारच्या छतावर बसवून ठेवले. मराठे यांची पत्नी कारच्या खिडकीवर बसून होती. स्थानिक सजग नागरिकांनी अग्निशमन दलाला फोन केला. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी येऊन मदतकार्य सुरू केले आणि मराठे कुटुंबाची संकटातून सुटका केली. पाण्यात अडकलेली कार तसेच मराठे कुटुंब यांना पाण्यातून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले.